यवतमाळ : ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेत कमी पडू नये यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दारव्हा, दिग्रस नेर तालुक्यातील युवकांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या युवकांना नामांकित संस्थेत प्रशिक्षण दिले जाणार असून मासिक खर्च भागविण्यासाठी रोख शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहे. या तिनही तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीसाठी दि.16 जून पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची शंभर गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा दि.23 जून रोजी दिग्रस, दारव्हा व नेर येथे घेतली जाणार आहे. नाव नोंदणी 8668920552, 9067580048, 9527930517 किंवा क्युआर कोड स्कॅन करून गुगल फॅार्मद्वारे करू शकतात. नोंदणीसाठी विद्यार्थी पदवीधारक असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या वर नसावे. युवकाचे वय किमान 21 वर्ष असणे आवश्यक आहे.
परिक्षेद्वारे शिष्यवृत्ती योजनेसाठी निवडलेल्या पात्र विद्यार्थ्यांची यादी दि.30 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दि.5 जुलै रोजी या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य व विद्यावेतनाचा पहिला हप्ता वितरीत केला जातील. त्यानंतर अमरावती येथील विदर्भ आयएएस अकॅडमी येथे दि.8 जुलै पासून स्पर्धा परीक्षा शिकवणीस सुरुवात होईल.
शिकवणीमध्ये तज्ञ मार्गदर्शकांद्वारे पुर्व व मुख्य परीक्षा तसेच मुलाखतीची तयारी, मुद्देनिहाय स्वतंत्र सराव चाचण्या, परिक्षाभिमुख विशेष कार्यशाळा, अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन व विद्यार्थी संवाद, तज्ञ पॅनलद्वारे मुलाखतींची तयारी, अभ्यास साहित्य अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अमरावती येथे निवास, भोजन व अन्य खर्च भागविण्यासाठी प्रत्येक युवकास प्रतिमाह 5 हजार रुपयांची मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण एकून 10 महिने कालावधीचे राहणार आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी मिळणे आवश्यक - संजय राठोड
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. अनेक होतकरू युवक क्षमता असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे स्पर्धा परिक्षेची तयारी करू शकत नाही. या स्पर्धेच्या युगात दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील विद्यार्थी मागे राहू नये, यासाठी मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. अमरावती येथील विदर्भ आयएएस अकॅडमी येथे युवकांना स्पर्धा परिक्षेचे चांगले प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तिनही तालुक्यातील युवकांनी नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.