यवतमाळ, दि २४ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करियर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आर्णी यांचे संयुक्त विद्यमानाने आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्णी येथे करण्यात आले होते. सदर रोजगार मेळाव्या मध्ये एकुण १७६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
या मेळाव्यात उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, यवतमाळ एलआयसी ऑफ इंडिया, दिग्रस मॅक वेहिकल प्रायव्हेट लिमिटेड, यवतमाळ, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड नागपूर, मेगाफीड बायोटेक, नागपूर, पिआयजीओ, बारामती/ पुणे, आर्म्स प्रायव्हेट लिमिटेड वाळूंज औरंगाबाद इत्यादी कंपन्यांनी त्यांच्याकडील एकूण ११५८ रिक्त पदांकरिता उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सदर रोजगार मेळाव्याचा एकूण २३६ उमेदवारांनी लाभ घेतला असून त्यापैकी १७६ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर रोजगार मेळाव्यामध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त विद्या शितोळे आणि सुधीर पटबागे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले. या रोजगार मेळाव्यामध्ये लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळ इत्यादी महामंडळांनी त्यांचेकडील योजने विषयीची माहिती सांगून कर्ज सुविधेचा लाभ घेण्याच्या आवाहन उमेदवारांना केले.
००००००