झरी: झरी जामणी तालुक्यातील शेतीवर अवलंबून असलेल्या तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी हे येत्या काही दिवसात पाऊस पडेल या आशेवर रणरणत्या उन्हात धूळ पेरणी करीत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे.
तालुक्यात खरीप हंगामातील मुख्य पिकाची जागा सोयाबीन ने घेतलेली आहे तर मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड सुद्धा तालुक्यातील शेतकरी करीत असतात. सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्यांनी कपाशीची लागवड काळ्या पाण्याच्या भरोशावर केलेली असून, अनेक शेतकरी ओलिताची सोय नसतांनाही जून महिन्याच्या प्रारंभी पाऊस पडतोच या आशेवर कपाशीची लागवड करीत आहेत. तालुक्यात सूर्य प्रचंड आग सद्या ओकत असून, तापमानाने उच्चांक गाठलेला असल्यामुळे सार्यांनाच पावसाची प्रतीक्षा आहे.
अशातच दहा ज्यून ला संध्याकाळी वीजांच्या कडकडांट सहीत ढगाळ वातावरण निर्माण होऊन अचानक हवा पंधरा मिनिटच पाऊस पडल्याने पावसाची सुर्वात होईल असे वाटले परंतु दुसर्या दिवशी वातावरण जशेच्या तशेच. सद्या मान्सूनचा प्रवास रेंगाळलेला असल्याने आणखी पुढील सहा ते सात दिवस सर्वत्रिक पाऊस पडणार नसल्याचे संकेत हवामान खात्यानेही दिलेले आहेत.
कपाशी बियाणे खूप महागडे असून, कपाशीची लागवड करताना खताचा सुद्धा वापर शेतकरी करीत आहेत. जमिनीमधील आधीच प्रचंड उष्णतेमुळे कपाशी बियाण्याची लागवड झाल्यानंतर व पुढे पावसाने ओढ दिल्यास कपाशीची उगवण क्षमता नाहीशी होऊन हे बियाणे खराब होण्याचा धोका असून, पाऊस पडल्यानंतरच कपाशी बियाण्याची लागवड करावी, असे जाणकार शेतकरी या संदर्भात आपले मत व्यक्त करीत आहेत.