Home / महाराष्ट्र / विवेकानंदाचा धर्म...

महाराष्ट्र

विवेकानंदाचा धर्म

विवेकानंदाचा धर्म

दत्तप्रसाद दाभोळकर

 

(भारतीय वार्ता):    जीवन, विकास व सुख-शांती या सगळ्यासाठी आवश्यक अशी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे विचार व आचार यांचे स्वातंत्र्य. ते जर नसेल तर राष्ट्र, मानव किंवा मानववंश यांचे पतन अटळ आहे. इतरांचे नुकसान होत नसेल तर आपण काय खावे, कोणते कपडे घालावेत व कोणाशी विवाह करावा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला हवा!
सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचा झेंडा त्रिखंडात फडकावला हे आपल्या मनावर वज्रलेप करण्यात आलंय. आणि हे ‘शतप्रतिशत’ खोटं आहे. सर्वधर्म परिषद ही त्यावेळच्या अमेरिकेतील सर्वात मोठी घटना होती. तीन वर्षे त्याची तयारी सुरू होती. मात्र, हिंदू धर्माने आपला प्रतिनिधी तेथे पाठवलेला नव्हता. परिषद यवनी भाषेत होती आणि वाटेत हिंदू धर्म बुडविणारा समुद्रप्रवास होता! विवेकानंदांनी आमंत्रण नसताना कसेबसे पैसे गोळा करून तेथे जाणे म्हणजे खेडय़ातील जत्रेत कुस्ती खेळणाऱ्या पहिलवानाने कोठेतरी ऑलिम्पिक सामने आहेत असे ऐकून तेथे कुस्ती खेळायला जाण्यासारखे होते. सर्वधर्म परिषदेच्या स्वागत कक्षातून खिल्ली उडवून विवेकानंदांना परत पाठवले होते. विवेकानंदांनी हे आमंत्रण कसे मिळवले, हा एक विलक्षण प्रकार आहे.

ही सर्वधर्म परिषद ११ सप्टेंबर १८९३ रोजी सुरू झाली. ती १७ दिवस होती. आपणासमोर येते ते ११ सप्टेंबरला उद्घाटनाच्या दिवशी त्यांनी केलेले पाच मिनिटांचे भाषण. तेसुद्धा समोर येते विस्कळीत स्वरूपात. मात्र, या १७ दिवसांत विवेकानंद पुन:पुन्हा काय सांगत होते, ते ‘बोस्टन इव्हिनिंग ट्रान्स्क्रिप्ट’च्या ३० सप्टेंबरच्या अंकात आहे. ती बातमी त्यांच्या प्रतिनिधीने २३ सप्टेंबरला पाठवली आहे. ती अशी : ‘विवेकानंदांची भाषणे आकाशासारखी व्यापक स्वरूपाची आहेत. सर्व धर्मातील सर्वोत्कृष्ट तत्त्वांचा ज्यात समावेश आहे अशा विश्वधर्माची त्यांच्या मनात कल्पना आहे.’ २८ सप्टेंबर रोजी समारोपाच्या समारंभात दिलेल्या भाषणात त्यांनी सांगितले, ‘सर्व धर्म एक आहेत. अध्यात्म म्हणजे पावित्र्य, चित्तशुद्धी, दया आणि हे सर्व धर्माचे मूलभूत आधार आहेत. माझा विश्वास आहे की सर्व धर्माच्या ध्वजावर लवकरच लिहिले जाईल- संघर्ष नको. परस्परांना सहाय्य करा. एकमेकांना आत्मसात करा. विनाश करू नका. कलह नको. मैत्री हवी. शांती हवी.’

विवेकानंदांच्या या अशा मांडणीमुळे हिंदू धर्माने विवेकानंदांना पूर्णपणे नाकारले होते. २० जून १८९४ रोजी हरीदास बिहारीलाल देसाई यांना पत्र पाठवून त्यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. आपल्या पत्रात ते म्हणतात, ‘मी अमेरिकेत येऊन नऊ महिने पूर्ण झाले. मात्र अजूनही मी हिंदूंचा प्रतिनिधी आहे असे अमेरिकन लोकांना स्पष्ट सांगण्याचा शंकराचार्यानी, हिंदू संघटनांनी वा हिंदू बांधवांनी काहीही प्रयत्न केला नाही. उलटपक्षी, हे लोक अमेरिकन लोकांना सांगत आहेत, की मी पक्का भोंदू माणूस असून, अमेरिकेत आल्यावर मी संन्याशाची वस्त्रे परिधान केली आहेत.’
हिंदू धर्म असे वागत होता यात हिंदू धर्माची अजिबात चूक नाही. मराठी माणसांना आवडेल अशा शब्दांत सांगायचे तर शाहू, फुले, आंबेडकर यांच्यापेक्षा अधिक भेदक अशी हिंदू धर्माची चिरफाड करत विवेकानंद उभे होते. १७ सप्टेंबर १८८९ रोजी पूज्यपादांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘माझी अगदी पूर्ण खात्री झाली आहे, की आपल्या देशातील प्राचीन मतानुसार जातीविभाग हा वंशगत मानलेला आहे आणि स्पार्टा देशातील लोकांनी तिथल्या गुलामांवर व अमेरिकेतील लोकांनी तेथील निग्रोंवर जेवढे अत्याचार केलेत त्यापेक्षा अधिक अत्याचार आपण या देशातील शुद्रांवर केले आहेत. आपले न्यायमत सांगते, ब्रह्मज्ञ ऋषींची वाणी म्हणजेच वेद. यादृष्टीने आपले ऋषी हे सर्वज्ञ होत. मग आजचे विज्ञान साध्या साध्या नियमांबाबत त्यांना अज्ञ ठरवते त्याचे काय? त्यांचा सूर्य सिद्धांत सांगतो- पृथ्वी त्रिकोणी असून, ती वासुकीच्या मस्तकावर आहे. हे त्यांचे ज्ञान नाकारल्याशिवाय अज्ञानातून सुटका होणार नाही.’

जून १८९० मध्ये विवेकानंदांनी वराहनगर मठ सोडला व भटका संन्याशी म्हणून ते बाहेर पडले. पुढील तीन वर्षांत त्यांनी भारत उभा-आडवा पिंजून काढला. २२ ऑगस्ट १८९२ रोजी दिवाणजींना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, ‘ज्यांच्या ४०० पिढय़ांनी वेद ही काय चीज आहे हे पाहिलेले नाही, ते पुरोहित आज देशाला वेद शिकवताहेत! देवा, ब्राह्मणांच्या रूपाने माझ्या देशात हिंडणाऱ्या या राक्षसांपासून माझ्या देशाचे रक्षण कर!’

२० ऑगस्ट १८९३ ला विवेकानंद सर्वधर्म परिषदेसाठी अमेरिकेत पोहोचले. परिषदेला फक्त तीन आठवडे उरले होते. पेरूमल यांना पत्र पाठवून विवेकानंद सांगतात, ‘हिंदू धर्माइतका इतर कोणताही धर्म कंठरवाने मानवाच्या महिम्याचा प्रचार करत नाही. हिंदू धर्म गरीब व खालच्या जातीच्या लोकांना जेवढा पायाखाली तुडवतो तितका जगातील इतर कोणताही धर्म तुडवत नाही.’

सर्वधर्म परिषदेत विवेकानंदांना अद्भुत यश मिळाले. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांनी वराहनगर मठातील त्यांचा मित्र शशी- जो श्रीरामकृष्णांचा सर्वात आवडता होता म्हणून ज्याला रामकृष्णानंद म्हणतात- यांना १९ मार्च १८९४ रोजी पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘भारतभर उच्च जातींकडून खालच्या जातींवर होणारे भयावह घृणास्पद अत्याचार मी पाहिलेत. मंदिरात शूद्रांना प्रवेश नाही. मात्र, मंदिरात देवदासी बनवून स्त्रियांना नाचवले जाते आहे. जो गरीबांचे दु:ख दूर करत नाही, जो माणसाची देवता बनवत नाही, त्याला काय धर्म म्हणावे? आमचा धर्म हा ‘धर्म’ या नावाला तरी पात्र आहे का?  या देशातील मोठमोठे शास्त्री-पंडित गेली दोन हजार वर्षे पाणी डाव्या बाजूने प्यावे की उजव्या बाजूने आणि गंध उभे लावावे की आडवे, असल्या महान प्रमेयांची चर्चा करत आहेत. त्या देशाची मग अधोगती होणार नाही तर मग दुसरे काय होणार? या देशातील बहुसंख्य माणसे अर्धनग्न व अर्धपोटी आहेत. या देशातील दहा-वीस लाख साधू आणि काही लाख शिक्षित लोक गरीबांचे रक्त शोषताहेत. हा काय देश आहे, की नरक? हा काय धर्म आहे, की हे आहे सैतानाचे तांडव?’

मात्र, विवेकानंद केवळ हिंदू धर्मावर घणाघाती टीका करून थांबत नाहीत, तर ते अस्वस्थ होऊन हा देश या भयावह परिस्थितीत का पोचलाय याचाही विचार करताहेत. रामकृष्णानंदांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, ‘मी बुद्धदेवांना सर्वाधिक मानतो. कारण जातीव्यवस्था हे या देशाच्या अवनतीचे एकमेव कारण आहे, हे त्यांनी सांगितलंय.’ दुसऱ्या एका पत्रात ते सांगताहेत, ‘या धर्माने ज्यावेळी समुद्रप्रवास नाकारला आणि ‘म्लेंछ’ हा शब्द शोधून काढला, त्या क्षणी या देशाच्या अवनतीची सुरवात झाली.’

आणि नीटपणे विचार केला तर या सर्वामागे फक्त एकच कारण आहे, हे अगदी खणखणीत शब्दांत ३ मार्च १८९४ रोजी सिंगारवेलू मुदलियार यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले. विवेकानंद सांगताहेत, ‘सामाजिक गोष्टींच्या बाबतीत धर्माने ढवळाढवळ केली, ही धर्माची सर्वात मोठी चूक आहे. सामाजिक नियमांचा कर्ता होण्याचा धर्माला काहीही अधिकार नाही. धर्माचा संबंध केवळ आत्म्याशी आहे, त्याने सामाजिक क्षेत्रात अजिबात ढवळाढवळ करू नये. आत्तापर्यंत जे अनर्थ घडले त्याचे एकमेव कारण- धर्माने सामाजिक बाबतीत ढवळाढवळ केली, हे आहे.’ धर्माने सामाजिक बाबतीत ढवळाढवळ केल्याने मानवी समाजाचे कसे अपरंपार नुकसान होते, हे त्यांनी उदाहरणे देऊन सांगितले आहे. त्यातील दोन उदाहरणे महत्त्वाची आहेत. संमती वयाच्या कायद्याबद्दल चर्चा सुरू होती त्यावेळी ब्रह्मानंदांना पत्र पाठवून विवेकानंदांनी सांगितले, ‘आठ वर्षांच्या मुलीचा तीस वर्षांच्या घोडनवऱ्याशी विवाह होतोय. या विवाहाबद्दल आई-वडिलांना आनंद होतोय. आणि आम्ही याला विरोध केला तर ‘तुम्ही आमचा धर्म बुडवत आहात’ अशी ओरड केली जाते. अरे, ज्यांना आपल्या मुली वयात येण्यापूर्वी तिला आई झालेली पाहण्याची घाई झालेली असते आणि त्यासाठी जे शास्त्रीय स्पष्टीकरण देतात, त्यांना कसला आलाय धर्म? काही जण सांगतात- मुस्लीम आक्रमकांपासून मुलींचे रक्षण करायला बालविवाह निर्माण झाले. अरे, आपण किती खोटे बोलणार आहोत? मी सर्व गुसूत्रे आणि ब्राह्मणग्रंथ अगदी बारकाईने वाचले आहेत. त्या सर्वाचा आदेश मुलगी लहान असताना तिचा विवाह करावा असा आहे. सर्व भाष्यकारांनी त्याची ग्वाही दिलेली आहे. धर्माने सामाजिक बाबतीत ढवळाढवळ करून दिलेल्या घृणास्पद गोष्टी ठामपणे नाकारण्याची वेळ आता आलेली आहे.’

गोहत्येबाबत विवेकानंद अधिक दाहकपणे सांगतात. बेलूर मठात विवेकानंदांना भेटावयास काही गोभक्त आले होते. भाकड गाईंसाठी ते पांजरपोळ चालवत होते. त्यांनी खूप पैसे या कार्यासाठी जमवले होते. विवेकानंद त्यांना म्हणाले, ‘आता गाईंना विसरा! आज मध्य प्रदेशात माणसे भुकेने तडफडून मरताहेत. ते सर्व पैसे तिकडे पाठवा.’ त्यावर ते सनातनी हिंदू विवेकानंदांना म्हणाले, ‘स्वामी, तुम्ही सांगता ते चुकीचे आहे. आमचे धर्मग्रंथ सांगताहेत की, ती माणसे भुकेने तडफडून मरताहेत, कारण त्यांनी गेल्या जन्मात पाप केले होते. आपण त्यांचा विचार करावयाचे काही कारण नाही.’ अस्वस्थ विवेकानंद त्यांना म्हणाले, ‘ही रचना फारच सोपी आहे. मग आता त्या गाईंनाही विसरा! त्यांनीही गेल्या जन्मात पाप केलेले असणार!’ यावर ते गोभक्त म्हणाले, ‘स्वामी, तुम्ही म्हणताय ते खरे! पण आपले धर्मग्रंथ सांगतात, की गाय ही आपली आई आहे. आणि आई कितीही वाईट असली तरी आपण तिचे रक्षण करावयास हवे.’ विवेकानंदातील खटय़ाळ मुलगा आता जागा झाला होता. त्यांनी त्या गोभक्तांना नमस्कार केला. म्हणाले, ‘आता निघा! तुमचे आई-वडील आज मला समजले.’ मात्र अस्वस्थ झालेल्या विवेकानंदांनी खिल्ली उडवून हा प्रश्न सोडलेला नाही. मालमदुरा येथे भाषण देताना त्यांनी सांगितले, ‘या देशात एक काळ असा होता, की गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राह्मण हा ब्राह्मण होऊ शकत नव्हता. आणि आपल्या वेदात तर सांगितलंय, की राजा किंवा फार मोठा ब्राह्मण घरी आला तर गाय-बैल कापून त्यांच्या रूचकर मांसाचे जेवण त्याला द्या.  मात्र, हा देश शेतीप्रधान आहे. गोवंश वाढला पाहिजे म्हणून आपण ही धर्माज्ञा बदलली. आज परिस्थिती बदलली असेल तर आपण पुन्हा त्यात बदल करावयास हवा.’

‘धर्म, त्याचा उद्देश आणि त्याची कार्यपद्धती’ या आपल्या निबंधात त्यांनी सांगितले, ‘एखादी गोष्ट धर्मग्रंथाने सांगितलेली असेल वा फार मोठा धर्मगुरू सांगत असेल; मात्र ती तुमच्या विचारशक्तीला पटत नसेल तर ती ठामपणे नाकारा. कारण परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी ही विचार करण्याची शक्ती आहे. विचार न करता एखादी गोष्ट तुम्ही आंधळेपणाने स्वीकारला तेव्हा तुम्ही खरे तर अगदी नकळत पशूच्या पातळीवर पोचता.’

धर्माने आपल्या मर्यादेत राहावे, हे विवेकानंद संयत शब्दांत आपल्या शिष्यांना पटवून देतात. मद्रासमधील शिष्यांना त्यांनी २४ जानेवारी १८९४ आणि १९ नोव्हेंबर १८९४ या दिवशी पत्रे लिहिलीत. या दोन्ही पत्रांत त्यांनी सांगितले - ‘जीवन, विकास व सुख-शांती या सगळ्यासाठी आवश्यक अशी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे विचार व आचार यांचे स्वातंत्र्य. ते जर नसेल तर राष्ट्र, मानव किंवा मानववंश यांचे पतन अटळ आहे. इतरांचे नुकसान होत नसेल तर आपण काय खावे, कोणते कपडे घालावेत, कोणाशी विवाह करावा, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला हवा.’

‘हा हिंदू धर्म बदलणार नसेल तर त्याच्याशी माझे काही देणेघेणे नाही,’ हे विवेकानंदांनी ९ सप्टेंबर १८९५ रोजी त्यांचा मित्र अळसिंगा पेरूमल यांना पाठवलेल्या पत्रात सांगितलंय. ते लिहितात, ‘फक्त सुशिक्षित हिंदूंमध्येच आढळून येणाऱ्या जात्यंध, धर्मभोळ्या, निर्दय, दांभिक अशा हिंदूंपैकी एक बनून जगावे व मरावे म्हणून मी जन्माला आलेलो नाही.’

अलमबझार मठातील आपल्या गुरुबंधूंना विवेकानंदांनी २७ एप्रिल १८९६ रोजी पत्र लिहिले आहे : ‘आपले देव आता जुने झालेत. आपल्याला आता नवे देव, नवे वेद आणि नवा धर्म हवा आहे, कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे.’

ही परिस्थिती आपण बदलू अशी अंधुकशी आशा त्यांच्या मनात आहे. मे १८९६ मध्ये कु. अलबर्टा स्टर्जीस यांना पाठविलेल्या पत्रात ते सांगतात, ‘मी लवकरच हिंदुस्थानात जात आहे. मला आपले कार्य तेथे चालू करता येईल का, हे मला पहावयाचे आहे. हिंदुस्थान म्हणजे निष्क्रिय व पुराणप्रिय लोकांचा विशाल जमाव आहे. सगळी जुनी निर्जीव अनुष्ठाने म्हणजे केवळ जुन्या भोळसट समजुती आहेत. ती जिवंत ठेवण्यासाठी कशाला धडपड करावयाची? तेथे मला अगदी नवीन काहीतरी सुरू करावयाचे आहे. ते साधे, पण सामर्थ्यशाली असेल.’

अशा मांडणीमुळे आणि वागण्यामुळे ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा यांना जे भोग भोगावे लागले तेच विवेकानंदांनाही भोगावे लागले. जानेवारी १८९७ मध्ये विवेकानंद भारतात परतले. ते परत आल्यावर महामहोमाध्याय गोपाळशास्त्री कराडकर यांनी वेदशास्त्रसंपन्न त्र्यंबकशास्त्री वैद्यांना सांगितले, ‘हा माणूस शूद्र आहे. समुद्रप्रवास करून आलाय. प्रायश्चित्त देऊनही याला शुद्ध करता येणार नाही!’ विवेकानंद कोलकत्याला पोचले तेव्हा ‘बंगवासी’ने लिहिले.. ‘हा माणूस शूद्र आहे. याला संन्यास घेण्याचा अधिकार नाही.’ २८ फेब्रुवारी १८९८ रोजी विवेकानंद भगिनी निवेदितांना घेऊन दक्षिणेश्वराच्या मंदिरात श्रीरामकृष्ण जयंती साजरी करावयास गेले. मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. विवेकानदांना अवमानित होऊन निमुटपणे इतरत्र श्रीरामकृष्ण जयंती साजरी करावी लागली. १४ सप्टेंबर १८९९ रोजी लंडनमधील त्यांचे मित्र ई. टी. स्टर्डी यांना पत्र पाठवून त्यांनी कळवलंय- ‘भारतात पाय ठेवल्याबरोबर लोकांनी मला मुंडण करावयास लावले. कफनी घालावयास लावली. या सर्वाचा परिणाम म्हणून माझे मधुमेहासारखे जुने आजार बळावले आहेत. अर्थात हे सर्व माझ्याच कर्माचे फळ आहे आणि त्यामुळे याबद्दल मला आनंद आहे. आता अनेक कारणांमुळे काही काळ तीव्र वेदना होत असल्या तरी आयुष्यातील एक मोठा अनुभवही मिळतो आहे. आता हा अनुभव या जन्मात उपयोगी येणार की पुढच्या जन्मी, एवढाच एक प्रश्न उरतो.’

विवेकानंदांनी बेलूर मठ स्थापन केला त्यावेळी देशातील एकाही धनिकाने वा संस्थानिकाने एक रुपयाचीही मदत केली नाही. सारे पैसे हेनरिटा मुल्लर या त्यांच्या लंडनमधील मैत्रिणीने दिले. बेलूर मठाचे सभासद होताना धर्म, पंथ, जात, लिंग आणि राष्ट्रीयत्व विचारात घेतले जाणार नव्हते. सर्व माणसे एकसमान आहेत असे बेलूर मठ मानत होता. त्यामुळे हा मठ नाही; असा मठ असूच शकत नाही; हे विवेकानंदांचे आरामगृह आहे, असे म्हणून कोलकता महापालिकेने बेलूर मठावर भलामोठा कर बसवला.

वयाच्या ३९ व्या वर्षी विवेकानंदांचा अकल्पित, अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी कोलकत्यातील कोणत्याही वृत्तपत्राने त्यांच्या मृत्यूची साधी बातमीही छापली नाही. शोकसभेत सामील होण्यासाठी बेलूर मठाने कोलकता उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांना बोलवले होते, दोघांनीही त्याला नकार दिला. कोलकता महापालिकेत श्रीरामकृष्णांच्या मृत्यूची नोंद आहे, परंतु विवेकानंदांच्या मृत्यूची नाही.

(लेखक ज्येष्ठ संशोधक असून, स्वामी विवेकानंदांच्या साहित्य-विचारांचे साक्षेपी अभ्यासक आहेत.)

 

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...