आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता
हा महत्त्वाचा प्रश्न आज कदाचित भारतातील बहुसंख्य आई-वडीलांच्या मनामध्ये असेल. आपण तर जगू, आपलं निभेल पण मुलांचं काय ? त्यांची उच्च शिक्षित मुले आज घरी बेरोजगार बसलेली त्यांना बघवत नसतील तसेच शिकत असतील तर त्यांचे भविष्य अंधारात दिसत असेल. पण आज आई-वडील जो विचार करत आहेत तो विचार नसून भूतकाळात ते जसे जगले त्याचा परिणाम आहे.
जी बघ्याची भूमिका त्यांनी भूतकाळात घेतली होती, आपण भले आणि आपलं घर भलं या विचाराने ते जगले होते, त्यांना त्यावेळी सामाजिक समस्या अनोळखी वाटल्या होत्या, देशात घडणारे आंदोलन त्यांना निरर्थक वाटले होते, राजकारण फालतू असते असं मत बनवून ते गप्प बसले होते, आपल्या राजकीय पक्षाला चिटकून ते बसले होते. सरकारला वाटेल ते करू दिलं होतं. भूतकाळात त्यांच्या वरीलप्रमाणे वागण्याचे पडसाद त्यांना आज बघायला मिळत आहेत व त्यांच्याच मुलांना आता या सर्वांचे वाईट परिणाम भोगायला मिळणार आहेत. भारतात योग्य विरोध होत नाही. विरोध काय असतो ? हे तर बहुतेक भारतीयांना माहितच नाही. शेजाऱ्याशी भांडणे व त्याला जिंकणे कदाचित एवढाच विरोध भारतीयांना माहित आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
भूतकाळात व सध्या नोकरीवर असलेले आई किंवा वडील शेतकऱ्यांची मजा पाहत बसले, शेतकरी मजूरांना दोष देत बसले, मजूर व कामगार आपला कुणी वाली नाही म्हणून गप्प बसले या सर्व घडामोडीत फक्त राजकारणी आपल्या पक्षाचा प्रचार करून आपल्या सर्वांना मतदार बनवत बसले आणि आपल्या सर्वांच्या गप्प पणाचा फायदा घेऊन राजकारणी आज आपल्या उरावर बसले. राजकारण्यांना जाब विचारणे त्यावेळी आपल्याला जमले नाही. राजासारखी वागणूक आपण त्यांना दिली व लाचारीचे जीवन आपल्या पदरात घेतले. त्यामुळे जसं डुकरे शेतात घुसल्यावर शेताची नासधूस करतात तसेच आजचे राजकारणी समाजात घुसून समाजाची व समोरच्या पिढीची नासधूस करत आहेत.
या देशातील सुप्रीम पाॅव्हर संसद आहे. खरी पाॅव्हर संसदेत मिळते. साधू-साध्वी संसदेत प्रवेश घेण्यास उतावीळ असतात आणि आई-वडील मंदिरात प्रवेश घेण्यासाठी बुकिंग करत असतात. सत्ताधारी एक कागद काढतात आणि तुमच्या सकट तुमच्या पिढीचा भविष्य एका झटक्यात अंधारात टाकतात. तुम्हाला उज्वल भविष्याचे स्वप्न दाखवून स्वतःच्या पिढीचे भविष्य उज्वल करतात. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या पिढीची कबर खोदणे आणि स्वतःच्या मरणाची वाट बघणे. शेतकऱ्यांना आपली मुले शेतकरी होऊ नये असं वाटते, आम्ही जे काबाडकष्ट केले ते मुलांच्या नशिबी येऊ नये असे कामगार व मजुरांना वाटते. पण त्या़ंच्या आजच्या विचारांचा व त्यांच्या भूतकाळातील वागण्यामधील विरोधाभास त्यांच्या आजही लक्षात आलेला नाही.
खरं पाहिलं तर राजकारणी मतदारांना घाबरतील अशी परिस्थिती देशात असणे म्हणजे लोकशाही. मतदार प्रत्येक अन्यायाचा व चुकीच्या धोरणांचा विरोध करण्याची धमक ठेवतील म्हणजे लोकशाही. मतदारांना आपली प्रगती करता येईल असे कायदे देशात असणे म्हणजे लोकशाही. ते छापले जाईल जे राजकारण्यांना आवडत नाही एवढी हिंमत मिडियात असणे म्हणजे लोकशाही. न्यायव्यवस्थेत सत्ताधाऱ्यांना शिक्षा करण्याची नैतिकता असावी म्हणजे लोकशाही. हे सर्व स्वप्न आहेत, जे कोणत्याही लोकशाहीत पूर्ण होतांना आज तरी दिसत नाही. पण आई-वडील व तरूणाई यांनी मनात आणलं तर क्षणात लोकशाहीचे हे सर्व स्वप्न पूर्ण करू शकतात.
आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांना दबावाखाली ठेवणे व जाब विचारणे आज आई-वडीलांना आवश्यक झाले आहे. शेतकरी, कामगार, मजूर व नोकरदार यांच एकछत्री किंवा विकेंद्रित संघटन असणे आवश्यक झाले असून समस्या कोणाचीही असो ती न्यायीक असल्यास विरोध सर्वांचं दिसणे अत्यावश्यक झाले आहे. अन्यथा गरीबांना गरीबच राहू देणे व गरीबच मरू देणे अशी व्यवस्था हे राजकारणी निर्माण केल्याशिवाय राहणार नाही किंबहुना आज तशीच परिस्थिती निर्माण झालीय असं म्हणायला हरकत नाही.
"जेव्हा सडक रिकामी असते तेव्हा संसद बदमाशी करते" हे लोहीया साहेबांचं वाक्य आज तंतोतंत खरं होतांना दिसत आहे. मधल्या काळात आपल्याला विकासाची स्वप्नं दाखवली गेली, करोडो रोजगाराचे गाजर दाखवले गेले पण या खोट्या विकासात नोकऱ्या कशा गहाळ केल्या गेल्या? याचा मागमूसही आई-वडीलांना झाला नाही. आई-वडील विकासाची वाट बघत बसले, मुलांना नोकऱ्या लागतील म्हणून स्वप्नात जगत बसले पण त्यांची उच्चशिक्षित मुलें आता ठेकेदारांच्या हाताखाली काम करणार म्हणजे लोकशाहीतील मुस्कट दाबलेले पगारी गुलाम बनणार. मुलांना उच्च शिक्षण देऊन केवळ गुलाम करण्यासाठीच आई-वडीलांनी कर्ज काढले, शेती विकल्या, घरं गहाण ठेवली, मजूरांनी पोटाला चिमटा काढला. हे सर्व समजून व एवढं सगळं होत असतानाही गप्प बसणे म्हणजे गिधाडांना आपलेच लचके तोडण्यासाठी आमंत्रण देणे होय.
मजुरांचा मुलगा कलेक्टर झाल्यावर सुरकुत्या पडलेल्या आईंच्या डोळ्यातील आनंदाश्रू आता दिसणार नाही, मुलांना बाहेरगावी शिकायला पाठवतांना बैल विकतात त्यावेळी बैल रडतात शेतकरीही रडतो ! ते रडणं आता दिसणार नाही, मुलांच्या शिक्षणासाठी पगाराच्या मर्यादेबाहेर कर्ज काढून तुटपुंज्या पगारात घर चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांची तगमग आता दिसणार नाही, लोकांच्या घरी भांडे घासून मुलांचे नशीब उजळवू पाहणाऱ्या आईचे नशीब आता कधी चमकणार नाही, मुलांच्या महिन्याच्या खर्चासाठी दिवसभर लाकडं फोडून रात्री तळहातावरचे फोडं शेकतांना आता बापाला वेदना होणार नाही. उपहास म्हणून बोलायचे झाल्यास, आपण आता मानसिक गुलामांची एक पिढी निर्माण करणार आहोत तसेच यांची येणारी समोरची पिढी यांना मिळणाऱ्या पगाराच्या अर्ध्या पगारावर ठेकेदारी गुलामी करेल, हे निश्चित. या सर्व कंत्राटी भरती बद्दल आता आई-वडीलांनी राजकारण्यांचे पाय धुवावेत, वाटल्यास त्यांचा अभिषेक करावा निदान आता कंत्राटी भरती मुळे वरील यातना आई-वडीलांना होणार नाही.
येणारी पिढी आता शासनदरबारी ठेकेदारांनी नेमलेले कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणार आहेत. म्हणजे आता दोन मालक होतील एक शासन आणि दुसरा ठेकेदार दोघांचाही आता विरोध करता येणार नाही, पगारवाढ मागता येणार नाही, महागाई भत्ता तर विसरून जा ! नाहीतर कंत्राटी नोकरी गेली म्हणून समजा. या सर्वांचा आई-वडीलांनी आनंद मानावा. गावभर पेढे वाटले तरी चालतील. कारण परिक्षा न देता हंगामी नोकरी सहज पगार तर आणेल पण त्यासोबत मानसिक गुलामी सुध्दा घरात आणेल. आता काय करायचं ! मग बसा चूप आणि खोदा एकमेकांच्या कबरी, वाट पहा दुसऱ्यांवर अन्याय होण्याची नंतर आपला नंबर येण्याची. NCRB च्या आकडेवारी नुसार 2019 मध्ये देशात दर तासाला एका बेरोजगाराने आत्महत्या केली असून ही बाब सरकारसाठी चिंताजनक नसेल मात्र कदाचित पुढची आत्महत्येची बातमी तुमच्या-आमच्या घरातील राहू शकते. त्यामुळे जर कुंपनच शेताला खाईल तर वाचवेल कोण ? अशी परिस्थिती घरांघरात निर्माण झाल्यास आई-वडीलांना आश्चर्य वाटायला नको.
शासन सर्वच स्तरावर असंतोष निर्माण करू पाहत आहे किंबहुना शासनाने निर्माण केलेला आहे. शेतकऱ्यांना पिकावर विश्वास नाही, मजूरांना कामावर विश्वास नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणावर विश्वास नाही, कर्मचाऱ्यांना पेंशनवर विश्वास नाही, व्यापाऱ्यांना बाजारावर विश्वास नाही, जनतेचा बॅंकावर विश्वास नाही, एका धर्माचा दुसऱ्या धर्मावर विश्वास नाही.अविश्वासाची चादर समाजात पध्दतशीरपणे अंथरली जात आहे जेणेकरून भीती प्रत्येक दारावर ठकठक करत राहील. त्यानंतर लबाड राजकारण्यांकडून भीती दूर करण्याचा आश्वासन दिला जाईल व मते मागितली जातील.
अशा सर्व सामाजिक अविश्वासात प्रत्येक घरातील आई-वडीलच समाजात परत विश्वास निर्माण करू शकतात. ज्यांनी आपल्या मेहनतीने आपली परिस्थिती बदलली ते सहज राजकारण्यांना धडा शिकवू शकतात. आपल्या मुलांच्या जीवांवर उठलेल्या सरकारला अद्दल घडवू शकतात. विद्यार्थी उज्वल भविष्याचे स्वप्न पाहू शकतील अशा संधी त्यांच्या ताटात वाढू शकतात. धर्म,जात,हिंसा,उत्सव, मिरवणूका, झेंडे विसरून आता पुरातन विचारांना मूठमाती देण्याची वेळ आलीय अन्यथा विद्यार्थ्यांना मूठभर माती देण्याची पाळी आई-वडिलांवर व समाजावर येणार आहे.
©️प्रा.आकाश
नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी
profakash123@gmail.com
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
भारतीय वार्ता प्रतिनिधी : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत शशांक बिसेन,ललित ब्राम्हणकर ,श्याम चाफले...