Home / विदर्भ / भंडारा / एक पत्र स्वातंत्र्...

विदर्भ    |    भंडारा

एक पत्र स्वातंत्र्याला

एक पत्र स्वातंत्र्याला

 

राजू बोरकर

७५०७०२५४६७

_____________

 

प्रिय स्वातंत्र्या ,

सप्रेम नमस्कार

 

      दचकलायस ना ! तुला वाटेल , ईतकी प्रचंड तांत्रीक प्रगती झाल्यावरही  मी हा असा पत्राच्या भानगडीत कसा बुवा!  पत्राची मला भारी आवड. सुरुवातीपासून पत्रांच्या प्रेमात पडलेला. आमच्या वेळी परिक्षेत हमखास आठ दहा गुणांचे दाेन तीन पत्र लिहावे लागायचे. आताच्या अभ्यासक्रमात आहेत की नाही माहीत नाही बूवा. नसतील तर नव्या पिढीला काैतूक वाटेल.म्हणून हा पत्रप्रयाेग. आम्ही शिकत असतांना एखादी मुलगी  आवडली की चार दाेन पानांचं प्रेमपत्र लिहून माेकळे व्हायचाे. आताची तरूणाई प्रेमात पडली की बाईक धरुन पाेरींचा पाठलाग करते.  आम्हाला सायकल पण भेटत नव्हती. अरे ! हे काय!मी तर नव्या जुन्या पीढीच्या अंतरात शिरलाेय. माफ कर. थोडी  घटनांची अशी क्रमवारी चुकत चाललीय. थाेडं विषयांतर झालं.  असाे. आता मुळ पत्राकडे वळू. .....

         प्रिय स्वातंत्र्या, ताकाला जाऊन दूधाचं भांडं लपवणं म्हणतात तसं  मी करत नाही. म्हणजे पत्रास तसे खास कारण नाही वगैरे म्हणुन पत्राचा रीतीरीवाज मी पाळणार नाही. कारण पत्रास तसे खास कारण आहे म्हणूनच पत्र लिहिताेय.  बऱ्याच तक्रारीनी भरलेलं हे पत्र तू वाचुन काढण्यापुर्वी तुला   तुझ्या वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. स्वातंत्र्या, अनेकांनी बलीदान दील्याची फलश्रुती म्हणजे,तू. तुझ्यासाठी जीवाचं रान करणारी माणसं ईथे इंचइंचाच्या अंतरावर भेटतात. ही तुझ्यामाझ्यासाठी प्रचंड अभिमानाची बाब आहे.पण सध्या तुझ्या अस्तीत्वाला आंतर्बाह्य धाेका निर्माण झालाय.एकीकडे पाकीस्तान आणि दुसरीकडे चिन बाईट घ्यायला तयार झालेत.दहशतवाद्यांचा जाेरही कधी ओसरला नाहीए. तुझ्या अस्तीत्वाला धाेका निर्माण हाेऊ नये म्हणून देशाच्या लाेकांनी ५६ ईंच छातीच्या माणसाला ह्या देशाचा कर्णधार बनविलं.त्याला आम्ही प्रधानमंत्री म्हणताे.हे महाशय पाकीस्तानच्या सैन्यांचे शिर घेऊन येण्याची भाषा करायचे.लाेकांना ते खरं वाटलं म्हणून संधी दीलीय. मग हाच कर्णधार पाकीस्तानच्या कर्णधाराशी चहापार्टी, स्नेहभाेज करु लागला. देश अनेक समस्यांच्या विळख्यात असतांना.  या महाशयांनी त्यावर ऊपाय शाेधण्यापेक्षा स्वच्छ भारत,निर्मल भारत अभियान सुरु केला. हळुहळु लाेक शायनिंग ईंडियाच्या प्रेमात पडलेत. माणसं ऊपाशी मरू लागली,तरी घराघरात संडास अनिवार्य झाला. राेजगार निर्मीतीतील आपलं अपयश असं झाकुन घेतलं.तुच सांग स्वातंत्र्या,हाताला काम नाही म्हणून दमडी नाही.माणुस खाईल तर मलविसर्जनाला जाईल. ईतकं साधं ईथे कळू नये,हे विस्मयचकीत करणारं आहे.कुपाेषणाच्या तर राेजच्याच बातम्या. ऊद्या तुझ्या रक्षणासाठी सिमेवर लढणारा सैनिक कसा निर्माण व्हावा? ह्या कर्णधाराचं ईतक्यावर समाधान झालं नाही म्हणून की काय नाेटबंदी लादलीय.काळा पैसा परत आणण्याच्या फुशारक्या मारल्यात.लाेकं पुन्हा बळी पडलेत.देशातील नव्वद टक्के गरिबांना वाटलं,सालं आपण तर कंगालच आहाेत.चला अदाणी,अंबाणीचा पैसा बाहेर येईल म्हणून हे लाेकं खुष झालेत.जवळचा श्रमाचा पैसा बँकेत जमा केला. १०००,५०० च्या नाेटा प्रत्येक खिशातुन हद्दपार झाल्यात. आणि गरिबांच्या पैशाने बँका श्रीमंत झाल्यात.त्यामुळे भांडवलदार ,कारखानदार पुन्हा कर्जाच्या मागण्यांसाठी तयार झालेत.पैसा गरीबांचा आणि ऊद्याेग अदानी अंबाणी......ईत्यादींचे. तेही गरिबांच्या पैशावर.ही माेठीच गंमत आहे.बरं पण ह्याच नव्वद टक्के लाेकांना बँक व एटाएम समाेर रांगा लावुन पैसा मिळाला नाही.दाेनशे लाेकांचा बळी गेला. आणि नितीन गडकरीच्या पाेरीच्या लग्नात काेट्यावधींची ऊधळण झाली. जनतेनं जाब विचारला पण त्याला ऊत्तर म्हणून काळं कुत्रही भुंकलं नाही.(मी कुण्या द्वीपाद प्राण्याला कुत्र म्हणालाे नाही. फक्त काळं कुत्र भुंकणे चा वाक्यात   ऊपयाेग केला.) स्वातंत्र्या ,कंसातील खुलाशाचा फार विचार करू नकाे.मला कुणी काेर्टात खेचलं तर दादा काेंडकेचे सगळे चित्रपट काेर्टात दाखवायला लावेन. मराठीवर माझं अमाप प्रेम आहे. मुंबईत दुकानाच्या पाट्या मराठीत लावा असा चिवचिवाट करणाऱ्या  माणसांपेक्षा माझं मराठी प्रेम शंभर पटीनं अधिक आहे. माफ कर ,थाेडं विषयांतर झालं . असाे.

 

    मागे शेतकरी संपावर गेले हाेते. असंघटीत शेतकऱ्यांचा  हा संप फसला.शेतकरी आत्महत्यांनी शेतशिवार आक्रंदुन ऊठलेत.धन्याच्या प्रेताकडे बघून बैल,गाय...ईत्यादी जनावरांनी हंबरुन शाेक व्यक्त केला. पण व्यवस्थेचे कीडे तसेच वळवळत राहीले. विधानसभा, लाेकसभा चालविण्याच्या नावावर नुसता थैमान ,गाेंधळ सुरू राहीला. बाहेर काही बीनडाेकांनी संपाची टर ऊडविली.आणि स्वातंत्र्या ,देशाचा पाेशिंदा विष घेऊन,गळफास घेउन अनंताच्या प्रवासाला निघाला.शवविच्छेदनाच्या नावावर ही प्रेतं नंतरही ताटकळत,अपमान सहन करीत चिरघरात पडुन राहीलेत. मग कुटुंबाला चारपाच लाखांची मदत घाेषीत झाली.त्यातही पाेटभरु कार्यकर्त्यांनी ,पत्रकारांनी आणि सेवा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी  आपला हीस्सा ठेवला.त्याच्या कुटुंबापर्यंत शेवटी लाख दीडलाख पाेहचलेत.शासकीय मदतीचं हे धगधगतं वास्तव आहे.

   आपल्या प्रधानमंत्र्यांनी बेराेजगारांना नाेकऱ्यांचं आमीष दाखविलं हाेतं.ते तसंच विरलं बेकारीचा विषय निघालाय म्हणून शैक्षणिक काळातील काही आठवणी ताज्या झाल्यात.दलीत साहित्याचे लेखक ,नाटककार दत्ता भगत ह्यांच्या ,"जहाज फुटलं आहे" ह्या नाटकातील काही संवाद आठवलेत."आम्ही पक्षी आहाेत एका झाडावरचे.एका थव्यातले.नुकतेच पंख फुटलेले.आम्ही आलाे आहाेत महाविद्यालय नावाच्या साेनेरी घरट्यातुन.पदव्यांचे रत्नहार चाेचीत घेऊन आलाे आहाेत.आम्हाला नाेकरी हवी आहे.साहेबाची . कारकुणाची .चपराशाची . नाहीच मीळाली तर झाडुवाल्याची सुद्धा." भगत सरांनी ही समस्या लेखनीबद्ध केली त्याला आता ३०/३२ वर्षे झाली असतील.सरांनी नाटकातुन दारिद्र्य आणि बेकारीचं ऊग्र रुप  मांडलं हाेतं.नाटकातील पात्रांचे आई वडील उभ्या पीकातील कणसं चाेरणारे.कुणी रिक्षा चालवणारे हाेते. गरिब हाेते. स्वातंत्र्या त्याच दरिद्र्यानं,बेकारीनं आज अधिक ऊग्र रूप धारण केलंय.आज सुशिक्षित बेकारांची क्रुर थट्टा चाललीय. पदवीधरांसाठी कुकुटपालन ,मेशपालन,गाेपालन....अशा व्यवसायीची तरतुद आहे.ऊच्च शिक्षितांना गायी,मेंढ्या,डुकरे ,काेंबड्या कळपाने चारण्यासाठी सरकार लाेण देत असेल तर ही थट्टा नाही तर काय आहे? ही गाय भाेंडी,ही गाय शिंगरी म्हणत गुरे पाळण्यासाठी आमचा बहुजन तरुण वयाची २२/२५ वर्षे खर्ची घालताे? आईवडील पाेराच्या नाेकरी व्यवसायाचे स्वप्न घेऊन शेतात माेलमजुरी करुन मरमर मरतात. आणि लाेण मिळालाच तर धंदा निट स्थिरस्थावर हाेण्यापुर्वीच बँकाच्या वसुली चकरा सुरु हाेतात.आणि निट ऊभा हाेऊ पहाणारा व्यवसाय काेलमडुन जाताे.पण ह्याच देशात,विजय माल्या आणि त्याच्यासारखे चाेर बँकांना कराेडाे रुपयांचा चुना लावुन पलायन करतातं. तरी आमचा तरुण सुशिक्षित बेकार स्वतःच्या विकासापेक्षा दगडाच्या विकासात,दींडी भजनात अधिक रममान झालाय.त्याला त्याच्या भविष्याची चिंता असण्यापेक्षा,मंदीर वही बनायेंगे चा मुद्दा अधिक महत्वाचा वाटताे.ही तरूणाई अशिच भावनिक हाेत गेल्यामुळे अंबाणी,अदाणी,माल्या आणि अशा बड्या ऊद्याेजकांच्या यशस्वी प्रवासात पायरीचा दगड झाली.तरीही सर्वत्र निरव शांतता पसरलीय.व्यवस्थेच्या विराेधात कुठेही ऊद्रेकाचं निशान नाही.बैलबाजारात बांधलेल्या अगतीक बैलासारखे कधी ह्याच्या तर कधी त्याच्या दावऩीला बांधले जातायत.तक्रारीचा सुरच पुसला गेलाय.त्यांच्या कवटीतील मेंदू कवटीच्या एका कप्प्यात खुरमुंडी घालुन निपचित पडलाय.आणि मी चिंतातुर जंतुसारखा चारचाैघांत नुसती वळवळ करताेय,व्यवस्थेचा नंगा नाच सहन हाेत नाही म्हणून!

       स्वातंत्र्या,  देशाच्या कर्णधारानं माजी राष्ट्रपती कलाम साहेबांच्या पुतळ्याचं अणावरण केलं.कलामांच्या हातात गीता आणि विणा असलेला ताे पुतळा आहे. साेशल मिडियावर अनेकांनी ताेंडसुख घेतलंय.उद्या हेच चेलेचपाटे  भडवेगीरीचा ईतिहास लिहितील.आणि हयातभर मिसाईलमँन म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या  कलामसाहेबांना ते भजन किर्तना दंग असायचे असा विचार मांडतील.आणि त्याही वेळी मुळ समस्यांवर उपाय शाेधण्याऐवजी कलामांना शास्त्रज्ञ ,मिसाईलमन म्हणून सिद्ध करण्यात बुद्धीवाद्यांचा वेळ जाईल.विकासाच्या मुद्यावर चर्चा हाेऊच नये ह्यासाठी ही कटाची सुरवात आहे.

 

         विश्वभुषण डाँं.बाबासाहेबांंनाही स्वच्छ भारत अभियानाशी जाेडून ते कचरा ऊचलतांनाचा फाेटाे दील्लीत बघायला मिळाला हाेता. बाबासाहेब जागतीक कीर्तीचं व्यक्तीमत्व आहे.पुर्वीचे हापपँट आणि आताचे फुलपँट वाले त्यांची उंची कमी करू शकत ऩाही.त्यांचे अनुयाई चाेख उत्तर द्यायला समर्थ आहेत.शेवटी उस्ट्या कपबशा धूणाऱ्या  चहावाल्याची अक्कल कपबशी फाेडण्यापुरतीच असणार .(स्वातंत्र्या,विनाेद झाल्यासारखा वाटत असेल तर हसून घे.)

 

        स्वातंत्र्या,खुप लिहिलंय ना! आणि थाेडं तिखट कडवट पण लिहिलंय.तसाही रीकामाच असताे.आयुष्य करपुन गेलंय.पण चार दाेन शब्दांनी चार दाेन दिव्यांच्या वाती पेटवता आल्यात तरी पुरे आहे.दीव्याने दीवा जळताे आणि दीपमाळ तयार हाेते,अशी पाेस्ट मी कालपरवाच  वँटस् अपवर वाचली आहे.म्हणून हा आशावाद व्यक्त केलाय. .

                स्वातंत्र्या, आता आईचं पाेट पाठीला टेकलंय.ती फार खंगलीय.बापाच्या गालावर मुदतपुर्व खड्डे पडलेत.ताे विडीचा धूर साेडताे.आणि विहीरीसारख्या खाेल डाेळ्यांत माझ्या नाेकरीव्यवसायाचे स्वप्न बघताे.बहीणही लग्नाच्या उंबरठ्यावरआहे.आणि माझी जिंदगी नारायण सुर्वे सरांच्या दाेन दिवस कवितेसारखी आहे.

 

"  दाेन दिवस वाट पहाण्यात केले

दाेन दुःखात गेले

हिश्ब करताे आहे

किती राहीले डाेईवर उन्हाळे

शेकडाेवेळा चंद्र आला

तारे फुलले

रात्र धुंद झाली

भाकरीचा चंद्र शाेधण्यातच

जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्वी

दारिद्र्याकडे गहाणच राहीले

कधी माना उंचावलेले

कधी कलम झालेले पाहीले...."

 

शेवटच्या कडव्यात ते यशस्वी हाेतात.आणि म्हणतात,

" झाेतभट्टीत शेकावे पाेलाद तसे आयुष्य छान शेकले"

पण स्वातंत्र्या ,मला आगकाडी आणि ईंधन मिळालंच नाही.हतबल झालाेयरे! बेकारी,ऊपासमार आणि महागाईच्या दुष्ट चक्रात गुदमर हाेतेय आयुष्याची. हे अरण्यरुदन माझं एकट्याचं नाहीए.ही सार्वजनिक समस्या आहे.ही माझी एकट्याची समस्या असती तर रडत कुथत बैसलाे असताे एकटाच.आणि तक्रारीचा सुरही तुझ्या कानावर टाकला नसता.स्वातंत्र्या, सांगना आमच्या कर्णधाराला.म्हणावं,म्हणावं,तेजतर्हार तरुणांच्या डाेळ्यांत नाेकरी,व्यवसायाचे स्वप्न भरलेत.आणि दील्लीच्या गल्लीत मजा मारताय.तुमच्या विदेश वाऱ्यांनी जागतिक पर्यटक वाटताय.आता थाेडा वेळ काढा .आणि देशातील नव्वद टक्के लाेकांच्या राेजीराेटीचे ,नाेकरी व्यवसायाचे प्रश्न निकाली काढा.

         स्वातंत्र्या ,खुप लिहाचंय.पण तुही त्रासला असशील पत्र वाचुन.मी तरी काय करणार..कुठे बेालायची साेयच ऊरली नाहीए.मग तुलाच लिहुन मेाकळं व्हावं म्हटलं.आणि हाे,पत्राचा रीतीरिवाज मी माेडला आहे.तीन परिच्छेदात मी काय काय लिहिणार.आणि घटनांचा क्रमही मागेपुढे झालाय.पाेटातील ओठांवर आलेल्या शब्दांच्या माेर्चाला ओळींत बसवुन शांत केलं.सारा भावनिक कल्लाेळ शांत झालाय.आता थाेडं माेकळं वाटतं.तुझ्या वाढदिवसाचा जल्लाेश करायला मी चाैकात येणार नाही.पण गैरसमज करु नकाेस.आम्ही हातावर पाेट घेऊन फीरणारी माणसंच तुझ्या रक्षणाची जबाबदारी स्विकारताे.कारण माल्या,अदाणी,अंबाणी,टाटा,बाटा आणि ईतर कारखानदार चिन आणि पाकीस्तानशीही जुळवून घेतील.म्हणुनच जरा समजुन घे.काल आमच्या सबंध कुटुंबाला ऊपास घडला.आज शरिरात फार काही त्राण नाही.मागील वर्षी तुझ्या वाढदिवसाला पाऊस हाेता. वळचणीच्या पाऊसधारा ओंजळीने पाेटात वळत्या करून भुक भागविली हाेती.आता तर पाऊसही मुतखडा झाल्यागत वागताेय.आला तर थेंबाथेंबांनी येताे आणि लगेच पसार हाेताे.वाढदिवसाला पाऊस घेवुन ये.माझ्यासारख्यांची साेय व्हावी म्हणुन!आणि आता तुच सांग,चाैकात येउन तुझ्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करू? व्यवस्थेच्या विराेधात काळ्या झेंड्यांनी निषेध करू?की गळफास घेउन,विषाची सबंध बाटली घशात रीकामी करुन व्रूत्तपत्रांच्या पहील्या पानाला भुकबळीची हेडलाईन देऊ?स्वातंत्र्या, आय कँन नाँट डीसाईड हं!हे सारं तुझ्यापुढे क्रमवारीनं ठेवतांना एका कविच्या ओळी आठवतात.,..

 

    "अंधार असा घनभारी

     चंद्रातुनी चंद्र बुडाले

    स्मरणाचा ऊत्सव जागुनी

     जणू दुःख घराला आले."

स्वातंत्र्या, ह्या कवितेनं मेंदु गरगरायला लागलाय.आता डाेकं गच्च दाबून जरा विश्रांती घेताे हं.!तुझ्या वाढदिवसाला पुन्हा आभाळभर शुभेच्छा.                      

                                     तुझा

                             एक दक्ष नागरिक

 

           

 

 

 

लेखक : राजू बाेरकर (भंडारा )

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

भंडारातील बातम्या

*महाअंनिस ची जनप्रबोधन यात्रा भंडारा शहरात दाखल.*

*महाअंनिस ची जनप्रबोधन यात्रा भंडारा शहरात दाखल.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली भंडारा:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन...

*मोगरा फुलला*

*मोगरा फुलला* राजू बोरकरलाखांदुर७५०७०२५४६७ ऐकतेयस ना .त्या टी पाॉईंटवरील आपली...

झाडीपट्टी रंगभूमीवरील आक्षेप आणि समर्थन

______________________________राजू बोरकर७५०७०२५४६७++++++++++ भंडारा , चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील काही भूभाग झाडीपट्टी...