शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
Reg No. MH-36-0010493
संविधानाने जखमांच्या देशाला माणूसकीचे सूत्र दिले - डॉ. यशवंत मनोहर
भारतीय वार्ता (प्रतिनिधी): संविधानाच्या प्रास्ताविकेतील तत्वे व मूल्ये जनमाणसांमध्ये रुजावी, सद्यास्थितीतील वास्तव लोकांपुढे मांडावे व देशहिताच्या दृष्टीने निकोप चर्चा व्हावी यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याचा "संविधानाची शाळा" हा नाविण्यपूर्ण कार्यक्रम संविधान फाऊंडेशनच्या वतीने सुरु करण्यात आला असून संविधान जागरासाठी आज महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या पर्वावर पहिला संवाद संविधान फाऊंडेशनचे संस्थापक तथा माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी ज्येष्ठ साहित्यिक, कवी व विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांचेशी समाजात संविधान जागृतीची आवश्यकता ! या विषयावर साधला. संवाद कार्यक्रमाची सुरुवात नेहा खोब्रागडे यांनी संविधान प्रास्ताविका वाचन करुन केली. प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांनी अतिथींचा परिचय करुन दिला तर डॉ. बबन जोगदंड यांनी आभार मानले. या संवाद कार्यक्रमाचा संक्षिप्त भाग खालीलप्रमाणे आहे.
देशाचे संविधान काय सांगते ? संविधान कशासाठी आणि कुणासाठी आहे? लोकापर्यंत संविधान पोहचविण्यासाठी काय करावे लागेल असे वाटते?
भारतीयत्व ही संकल्पना आणि तिचा आशय आता बदलला असून ती पूर्णतः क्रांतिकारी झाली आहे. समाजवाद, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य या मूल्य संकल्पनांचा एक मूल्यकोश अशाप्रकारच्या स्वरूप आलेला आहे. संविधान अंमलात येण्यापूर्वी भारतीयत्व विरुद्ध वैदिक तत्व, भारतीयत्व विरुद्ध ब्राह्मणवाद हा संघर्ष होता. या संघर्षातूनच भारतीयत्व ही संकल्पना बुद्धकाळापासून ते महात्मा ज्योतिबा फुले ते बाबासाहेंबापर्यंत आलेली आहे. भारताच्या संविधानात जे वैश्विक मूल्य आहे ते मूल्य म्हणजे भारतीयत्व होय. भारतीय संविधानाने हा देश जोडलेला आहे. संविधानाने जखमांच्या या देशाला एक सूत्र दिले आणि हे सूत्र आहे माणुसकीचे. एकसंघतेची, जैविकतेची, सेंद्रियतेची, करुणेची, माणूसपणाची संकल्पना बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून देशाला दिली. भारताचे संविधान हे समस्त देशवासीयांसाठी आहे. संविधानाला जे मानत नाही त्या गैरभारतीयांना सुद्धा भारतीयत्व देणारे हे संविधान आहे. 'आम्ही भारताचे लोक' हे क्रांतीविधान आहे. विविधतेत ऐक्य हे सूत्र भारतीयत्व या संकल्पनेत आहे. संविधान भारतातील सर्व लोकांना एकसंघ, एकहृदय, एकजीव करणारे आहे.
संविधानाची तत्वे-मूल्ये संविधानिक संस्थातील लोकांमध्ये रुजली आहेत असे आपणास वाटते का? हे लोक संविधाननिष्ठ होण्यासाठी काय करावे लागेल ?
संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही. सविधान हळूहळू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला लागले आहे. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी जर मनावर घेतले, संविधान सर्व अभ्यासक्रमात समाविष्ट झाले, संविधानावर छोट्या-छोट्या पुस्तिका आणि साहित्य निर्माण झाले तर संविधान जागराचा वेग वाढेल. संविधान लोकांपर्यंत का पोहोचू दिले नाही? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सविधान लोकांपर्यंत पोहोचला तर हा देश क्रांतीच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचेल. समाज मूल्याधिष्ठित होईल. समाज प्रश्न विचारेल, अशी भिती प्रस्थापितांना होती. शासन-प्रशासनातील लोक, बुद्धिजीवी, विचारवंत आणि साहित्यिक यांच्यापर्यंत संविधान पोहोचवण्यासाठी शासनाने कायदा करणे गरजेचे आहे. संविधानाचे पालन करणे बंधनकारक असावे. संविधानाचे पालन न केल्यास त्यांना निलंबित करणे, वजा करणे यासाठी शासनाने अध्यादेश काढावा. संविधानाची इच्छा प्रत्यक्षात साकारण्यासाठी हा कायदा व्हावा. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कायद्यापेक्षा माणुसकीचा निर्णय महत्त्वाचा आहे. सविधान निष्ठा म्हणजे जात्यातीत, धर्मातीत, प्रदेशातीत यापासून वेगळे होणे, दूर जाणे होय. यासाठी माणसाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया गतिमान केली पाहिजे. मनाचे नियोजन, माणुसकी, करूणा असेल तर तुम्ही संविधान निष्ठ होता. तुम्ही संविधाननिष्ठ होणे अटळ आहे. संविधानातील मूल्यव्यवस्था माणुसकीच्या प्रस्थापनेचीच आहे. त्यासाठी संविधानाचे ऐका, बहीरे होऊ नका. संविधान वाचा, आंधळे होऊ नका. आपल्या माणुसकीला गोठू देऊ नका म्हणजे देशातील सर्व प्रश्न निकाली निघतील.
संविधानाच्या जागरासाठी संविधानावर सोप्या भाषेत व समजेल असं साहित्य निर्माण करणे, संविधान साहित्य संमेलनासारखे विविध कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे असे वाटते, आपलं काय मत आहे ?
संविधानाचे साहित्य म्हणजे सर्वसामान्य, सुशिक्षित आणि राजकीय लोकांपर्यंत संविधानाचे मूल्ये पोहोचवणारे साहित्य होय. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या पातळीवर संविधान समिती तयार करावी. साहित्य कशा प्रकारचे असावे, साहित्य कुठल्या प्रकारचे असावे, साहित्याची भाषा कशी असावी, याचा विचार समितीने करावा. अशा प्रकारचा निर्णय घेऊन, विचार करून समितीने लेखकांची निवड करावी. त्यांना वेगवेगळे विषय द्यावे. त्यांच्याकडून पुस्तकं लिहून घ्यावे. साहित्य निर्माण करून घ्यावे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र एका सूत्रात गुंफला जाईल. हे पुस्तक-साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची सुद्धा शासनाने व्यवस्था-प्रक्रिया करावी. अशीच प्रक्रिया भारत सरकारच्या पातळीवर व्हावी. सर्व राज्यांमध्ये त्या त्या राज्यातील भाषेत अशा प्रकारच्या साहित्य निर्माणाच्या प्रक्रिया सुरू व्हाव्यात. सविधान साक्षरतेचे अभियान राबवणे गरजेचे आहे. केंद्र शासनाने यासाठी पुढाकार घ्यावा. सविधान जागरासाठी भाषणाच्या मालिका, कार्यकर्त्यांची निवड केली पाहिजे, वेगवेगळ्या पातळीवर जसे गाव, तालुका, जिल्हा पातळीवर शिबिरे, मेळावे व संमेलने आयोजित व्हावेत. संविधान सर्वसामान्य, उपेक्षित, शोषित समाजापर्यंत पोहोचले तर हे संविधान आपला हात धरून आपल्याला राज्यकर्ते करू इच्छिते असा विश्वास सुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये निर्माण होईल.
संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, बुद्धिजीवी, अधिकारी कर्मचारी, समाज संघटना/कार्यकर्ते/साहित्यिक व विचारवंतांची भूमिका कशी असावी?
बहुतेक बुद्धिजीवी, विचारवंत, राजकारणी, यातल्या अनेकांनी संविधान बघितलेच नसतं. सविधानाचं पुस्तक बघणे, वाचने, संविधानाचे पुस्तक वाचून संविधानातील मूल्यदर्शन समजून घेणे गरजेचे आहे. संविधान केवळ बोलण्यासाठी नाही, तो जगण्याचा ग्रंथ आहे. संविधानात निरामय माणूसपणाची जीवनशैली आहे. जो माणूस संविधानाचा पक्ष घेऊन पुढे येईल त्याच्याबद्दल समाजामध्ये आदर निर्माण होतो. या देशातील शिक्षक, अध्यापक, प्राध्यापकांनी जर मनावर घेतले तर ते हा देश संविधानमय करू शकतात. ज्या क्षणी या सगळ्या अध्यापकांना वाटेल, त्या क्षणी हा देश संविधानमय होईल. संविधान मूल्य नाकारणाऱ्या शिक्षकांवर शासनाने कठोर कारवाई करावी. शिक्षकाची नवी व्याख्या आता आपल्याला तयार करावी लागेल.
कोरोना सारख्या आपत्ती/संकटसमयी संविधान आपणास काय शिकविते, आपले वर्तन कसे असावे? याबद्धल मार्गदर्शन करावे.
कोरोना महामारी आहे. विलक्षण असं संकट आहे. संविधानामध्ये वने, नद्या, सरोवरे, सगळ्या प्रकारचे पर्यावरण जपले पाहिजे अशा प्रकारचे मार्गदर्शक तत्व आहे. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. कोरोना या संकटाचा संबंध पर्यावरणाशी जोडतो. सार्वजनिक नीतिमत्ता, सार्वजनिक आरोग्य, हे सुव्यवस्थेचे तत्व यामागे आहे. सद्सद् विवेकाचे तत्त्व आहे. चांगले-वाईट, माणूस-अमाणूस अशा प्रकारच्या संदर्भात विवेक असला पाहिजे. 'असद्' चे निर्मूलन आणि 'सद्'चे संवर्धन करा. कोरोना या काळातील अपप्रवृत्ती आणि राजकारणाची दिशा बदलण्यास भाग पाडतो. माणसाच्या मनाची रचना बदलली पाहिजे. मानसिकतेची रचना बदलली पाहिजे. दैववाद त्यागन्याची गरज आहे. पारंपरिक पद्धती बदलण्याची गरज आहे. स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मनातील कु-प्रथांवर हल्ला केल्यास कोरोनाचा पराभव होईल. जबाबदारी, सलोखा निर्माण करणारे राजकारण कसे जन्माला येईल, अशा प्रकारच्या सविधाननिष्ठ मनाची निर्मिती होणे गरजेचे आहे.
संवाद साधताना इ. झेड. खोब्रागडे यांनी सांगितले की, नागपूर येथून २००५ ला सुरू केलेला संविधान प्रास्ताविका वाचन उपक्रम आणि संविधान दिवस, २०१५ पासून देशभर होऊ लागला. अभ्यासक्रमात संविधान हा विषय अनिवार्य करणे, संविधानाची शाळा चालविणे, संविधानिक मूल्यांवर साहित्य निर्माण करणे, संविधान परिषदा, साहित्य संमेलन, संविधान पुस्तक मेळावा, संविधान स्तंभ इत्यादीसाठी केंद्र व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार केला असून पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.
वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...