Home / महाराष्ट्र / पश्चिम-महाराष्ट्र / *मराठा सेवा संघ : एक प्रेरणादायी...

महाराष्ट्र    |    पश्चिम-महाराष्ट्र

*मराठा सेवा संघ : एक प्रेरणादायी वैचारिक चळवळ*

*मराठा सेवा संघ :  एक प्रेरणादायी वैचारिक चळवळ*

भारतीय वार्ता,:

=========== अनिल भुसारी

       भारतात हजारो वर्षांपासून  ब्राम्हणी (मनुवादी/ सनातनी) व्यवस्था शोषणाची पुरस्कर्ती राहिलेली आहे. या शोषणवादी व्यवस्थेविरुद्ध शोषित लोकांनी शोषणाविरुद्ध कायम आवाज उठवून एक चळवळ निर्माण केली. या चळवळीस अब्राह्मणी चळवळ किंवा बहूजनांची चळवळ म्हणून संबोधल्या जातो. या चळवळीमध्ये ओबीसी- मराठा-कुणबी , एस. सी., एस. टी. व शोषणाविरुद्ध जो समूह आवाज उठवतो तो. ज्यांना अन्यायाविरुद्ध चिड निर्माण होते, जे मानवतावादी दृष्टिकोन ठेवून काम करतात ते परिवर्तनवादी चळवळ चालवितात. शोषणवादी व्यवस्था समूळ नष्ट करण्याच्या उद्देशानेच ०१ सप्टेंबर १९९० ला अकोला येथे मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन "मराठा सेवा संघाची" स्थापना केली.  

               मराठा सेवा संघाच्या स्थापनेपासून राज्यात व देशात धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात बरेच परिवर्तन बघायला मिळाले आहे. मराठा सेवा संघाने या ३2 वर्षात सामाजिक परिवर्तना बरोबर जातिय व धार्मिक तेढ नष्ट करण्याचे काम केले आहे.  मराठा- कुणबी - ओबीसींच्या घरातील भिंतीवर आंबेडकर-बुद्ध लावले तर मुस्लिमांच्या घरांच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराज लागलेत. महत्त्वाचे म्हणजे धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील परिवर्तन आणि महिलांच्या नेतृत्वाला संधी देऊन या देशातील बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक परिवर्तनवादी संघटनांचे मराठा सेवा संघ हे प्रेरणा अर्थात आयडॉल ठरले आहे. अलीकडील उदाहरण द्यायचे झाल्यास हनुमान चालीसाच्या नावाने बहुजन हिंदू धर्मीय लोकांच्या भावना भडकवून हिंदू -मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि तो अजून सुरु आहे. परंतु मराठा सेवा संघाने 32 वर्षात जे सामाजिक एकोपा राहण्याच्या दृष्टीने धार्मिक विचारा बाबतीत प्रबोधन केले आहे त्यामुळे महाराष्ट्रात जातीय - धार्मिक वाद आणि दंगली होऊ शकल्या नाहीत.

               *नवे विचार - नव्या रुढी:-*  कोणत्याही समाजाला सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कालबाह्य झालेल्या विचार व रुढींना मागे टाकून नवे विचार व नव्या रुढी निर्माण कराव्या लागतात.  मराठा सेवा संघाने ३2 वर्षात ते निर्माण केले आहे. कोणत्याही स्वागतावेळी बुके देण्याऐवजी बुक द्यावे हा विचार. दोन व्यक्ती भेटल्यानंतर  पहिल्यांदाच एका स्त्रीचा उदघोष करण्याचा नवा विचार म्हणजे "जय जिजाऊ."* गावा - गावात मंदिरे बांधण्याऐवजी वाचनालय निर्माण करावे व ते शक्य नसेल तर गावातील देवालयालाच वाचनालय बनवा, हा संदेश दिला.  दंगली माजविणाऱ्या तरूणांच्या हातातून दगड - विटा काढून पुस्तक व पेन दिले. काही संघटना व पक्ष धार्मिक तेढ निर्माण करुन प्रार्थना स्थळांची निर्मिती करण्यात मश्गूल असतांना मराठा सेवा संघाने सिंदखेडराजा येथे देखणी व प्रेरणादायी असणाऱ्या जिजाऊ सृष्टीच्या कार्याला प्रारंभ केला. तसेच सुशिक्षित व शिक्षित लोकांना नव-नव्या संशोधनाकरिता नागपूर येथे "बळिराजा संशोधन केंद्राची" स्थापना करण्यात आली आहे. शिव_फुले - शाहू- आंबेडकर यांना ज्या विधायक कार्याची अपेक्षा होती त्या पद्धतीने मराठा सेवा संघाने सुरुवात केली आहे. परिवर्तनवादी चळवळीतील इतर  संघटनांना जे शक्य झाले नाही ते मराठा सेवा संघाने केले आहे म्हणून मराठा सेवा संघ हा एक प्रेरणादायी विचार आणि अशादायी चळवळ आहे.  

               *धर्म :-* धर्म हा मानवाला नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक दिशा दाखविण्याबरोबर परिवर्तनवादी व संपूर्ण जगाला विकासाच्या समान संधी देणारा असायला हवा. परंतु भारतात वैदिक धर्माने परिवर्तनाचे मार्ग बंद करून मानवात भेद निर्माण करुन जातीय उतरंडी निर्माण केल्यात. वैदिक धर्माने समाजात टोकाची विषमता निर्माण केली आहे. या शोषण व्यवस्थेपासून ओबीसी- मराठा- कुणबी बहुजन समाजाला मुक्ती मिळण्यासाठी व वैदिक धर्माशी असलेले संबध तोंडुन  १२ जानेवारी २००५ ला "शिवधर्माचे" प्रकटन करण्यात आले. वर्तमान काळात धार्मिक क्षेत्रात मराठा सेवा संघाने केलेले हे मोठे परिवर्तनिय काम आहे. मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांव्यतिरिक्त लाखो बहुजन समाज शिवधर्माचे अनुकरण करत आहे. आता पर्यंत स्थापन करण्यात आलेल्या धर्मावर पुरुषांचे वर्चस्व व स्त्रीला दुय्यम स्थान देण्यात आले होते. शिवधर्माने मात्र शिवधर्मीयांची प्रेरणा म्हणून मानवतावादाचा, स्त्रित्वाचा, मातृत्वाचा उच्चतम आदर्श असणाऱ्या जिजाऊंना आद्यस्थान देऊन मातृ संस्कृतीचा स्वीकार करून स्त्री - पुरुष या भेदाला नाकारून स्त्री -पुरुष ही समतेची प्रतिके आहेत हा विचार शिवधर्माच्या माध्यमातून दिला. मंगलमयी प्रसंगी करण्यात येणाऱ्या विधी स्त्रीच्या हाताने करण्याला प्राधान्य देण्यात आले, धर्मात असणारी मध्यस्थी - दलाली ही मोडून काढता येतो हा विश्वास शिवधर्माने लोकांना दिला आहे. शिवधर्मामुळे इथल्या वैदिक सनातनी व्यवस्थेला जबर धक्के बसले आहेत.

*राजकारण :-*  भारतात ८५% बहुजन समाज असून १५% वाले सत्तेचा मलिदा चाखत आहेत. आपण कितीही परिवर्तनाचे काम केले परंतु जेव्हा पर्यंत त्यास राजाश्रय प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व येत नाही. (बौद्ध धर्म अनेक राजांनी स्विकारला)  म्हणून संपूर्ण परिवर्तना करिता मराठा सेवा संघाने १००% समाजकारण व १००% राजकारण* हा उद्देश ठेवून "शेतकऱ्यांच्या सनमानात - संभाजी ब्रिगेड मैदानात" ही घोषणा देत संभाजी ब्रिगेडला राजकारणाच्या मैदानात उतरवले. बहुजनांची सत्ता यावी म्हणून बहुसंख्य तरुण संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत आहेत. संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी प्रस्थापित व्यवस्थेला  हादरवून सोडल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे बघत आहेत. मित्रांनो ब्रिगेड हे नाव आज तरुणांची ओळख झाली आहे. तिला अजून प्रामाणिकपणे पाठबळ देण्याची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी संभाजी ब्रिगेडचा झेंडा खांद्यावर आणि महामानवांचा विचार डोक्यात घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत जाणे आवश्यक आहे. तेव्हाच खोके घेऊन बोके बनणाऱ्या राजकीय संस्कृतीला गाडता येईल.

*शिक्षण :-* "फाटकं कपडे घाला, घरातील ताट मोडून हातावर भाकरी खा, पण पोराले शिकवा". हा गाडगेबाबांचा संदेश घेऊन मराठा सेवा संघाने शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य केले आहे. महाराष्ट्रभर जिजाऊ ज्ञान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. गाव सोडा, प्रसंग आला तर भिक मागा पण मुलांना शिकवा. हा संदेश बहुजनापर्यंत पोहचवला. ग्रामीण भागातील तरुणांना शहरात शिक्षण घेता यावं म्हणून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तीगृह व वाचनालयाची निर्मिती करण्यात आली आहे. मराठा सेवा संघाने डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या माध्यमातून राज्यभर तालुका ते राज्यस्तरीय अधिवेशने घेऊन शैक्षणिक जागृती घडवून आणली आहे. ज्या समाजाला शेती हेच सर्वस्व वाटून शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कुणबी - मराठा, ओबीसी समाजाला मात्र मराठा सेवा संघांने शिक्षणाचे महत्व पटवून दिले. बाबासाहेब आंबेडकर यांचे , "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.". "शिक्षण हॆ वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरु गुरल्याशिवाय राहणार नाहीं "  हॆ संदेश समाजा पर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे काम केले त्यामुळे या 32 वर्षात कुणबी -मराठा, ओबीसी समाजातील अनेक तरुण क्लास फोर ते क्लास वन च्या पदा पर्यंत पोहचू शकले. न पिकणारी शेती विकून मुलांना शिकवण्याची संस्कृती रुजविण्याचे काम मराठा सेवा संघाने केले आहे.

*स्त्री :-* बहुजन स्त्रिला धार्मिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक प्रश्नांतून बाहेर पडून सर्व क्षेत्रातील नेतृत्व करता यावे याकरिता आधुनिक परिवर्तनाची दिशा देण्याच्या दृष्टीने महिलांसाठी प्रबोधन प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात येतात.  या शिबिरात प्रशिक्षीत झालेल्या महिला त्यांच्या क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. जगातील सर्व धर्मांचे संस्थापक पुरुष आहेत व त्या प्रत्येक धर्माचे प्रेरणास्थान पुरुष आहेत. मात्र मराठा सेवा संघाने प्रकटन केलेल्या शिवधर्माचे प्रेरणास्थान एक स्त्री आहे. जगातील सर्व स्त्रियांचे प्रतिनिधित्व करतात त्या म्हणजे जिजाऊ. आणि जगलातील एकमेव शिवधर्म असा धर्म आहे जो स्त्रिचं नाव घेऊन अभिवादन करतो. ते म्हणजे जय जिजाऊ. आणि हे फक्त मराठा सेवा संघाने केले आहे. स्त्री म्हणूनही त्यांचे वेगळे प्रश्न - समस्या असतात. त्या सोडविण्याकरिता त्यांना हक्काचं मंच असावा, त्यांना विचारांचं आदान - प्रदान करता यावं, विषमतावादी शोषण व्यवस्थे विरुद्ध संघटितपणे लढा देता यावा. तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे...

"जेव्हा पुरुष पावतो पतना, त्यास स्त्रीप्रकृती सहन होईना | तेव्हा महिलात असावी संघटना, त्याची सुधारणा करावया || जैसी मुलांची संघटित सेना, तैसी स्त्रियांची असावी संघटना | आपुल्या सुख दुःखाच्या भावना, प्रगटव्या सभा - संमेलनी || हा विचार घेऊन स्त्रियांसाठी "जिजाऊ ब्रिगेड" या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. स्त्रीचा एवढा सन्मान जगातील कोणत्याही सामाजिक परिवर्तनवादी संघटनाना करता आलं नाही ते मराठा सेवा संघाने केले. मराठा सेवा संघाच्या विचाराने प्रेरित झालेल्या  ज्या स्त्रिया कुटुंब प्रमुख म्हणून काम करत आहेत त्या कुटुंबात सुख -समाधान, यश नांदत आहे. मराठा सेवा संघाने अनेक आंदोलने स्त्रियांच्या नेतृत्वाखाली केले आहेत.

*प्रबोधनाला संस्थात्मक कार्याची जोड :-* कुणबी -मराठा, बहुजन समाजाचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय वैचारिक विकास होण्याच्या दृष्टीने प्रबोधन करण्याचे काम बहुजन समाजाच्या अनेक संघटना करत आहेत. परंतु त्या कार्याला संस्थात्मक विधायक स्वरूप देतांना दिसत नाहीं. तथागत गौतम बुद्धाच्या धम्म क्रांतीतून अनेक विद्यापीठाची निर्मिती झाली, समतावादी बुद्ध धर्माची निर्मिती, मानवतावादी संस्कृती रुजली, मानवतावादी दृष्टीकोन ठेवून राजे राज्य करू लागले, सम्राट अशोकाने त्यावर कळस चढवीला. मध्ययुगीन काळाचा विचार केल्यास संताच्या समतावादी विचाराच्या पेरणीतून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला आपलंस आणि हवं -हवंस वाटणाऱ्या स्वराज्याची निर्मिती केली. आधुनिक काळाचा सुरुवातीच्या कालखंडाचा विचार केल्यास महात्मा फुलेनी बहुजनाचे प्रबोधन करण्याबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने कार्य केले, लोकांच्या डोक्यात विचार जावे म्हणून ग्रंथाची निर्मिती केली, सनातनी -धार्मिक गुलामी नाकारत "सत्यशोधक समाजाची" स्थापना केली, शेतकऱ्यांना अधिकार मिळवून दिले, सत्यशोधकी विचारातून मजुरांचे संघटन तयार झाले, उद्योगांची निर्मिती केली. शाहू महाराजांनी शिवराय आणि फुलेंचा कित्ता गिरवत, एक पाऊल पुढे जात वसतिगृहांची स्थापना करून बहुजनांना सत्तेत वाटा मिळावा म्हणून संधी देण्याच्या दृष्टीने प्रशासनात जागा आरक्षित केल्या. तर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी तर सर्व समाजात मानवतादी दृष्टिकोन निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रबोधन करून प्रत्येक क्षेत्राला संस्थात्मक स्वरूप दिले.धर्माने वाळीत टाकलेल्या समाजाला धर्म दिला (धर्म सत्ता ). लिहिण्या -वाचण्याच्या अधिकारापासून दूर ठेवलेल्या समाजाच्या हातात पेन आणि पुस्तकं दिले, शाळा - विद्यापीठाची निर्मिती केली (शिक्षण सत्ता ). आपलं म्हणणं जगात पोहचावे याकरिता वृत्तपत्रांची निर्मिती केली (प्रचार - प्रसार माध्यम सत्ता ), लोकशाही शासन व्यवस्थेत सत्ताधारी समाज बनायचं असेल तर राजकीय पक्ष आपले असणे आवश्यक आहेत म्हणून राजकीय पक्षांची स्थापना करून अनेकांना राजकीय संधी मिळवून दिल्या (राजसत्ता ).

       प्रबोधना बरोबर अशी संस्थात्मक विधायक कार्य करणाऱ्या  महामानवांचे विचार सांगणाऱ्या संघटना बहू झाल्या परंतु प्रबोधनाच्या पलीकडचा टप्पा मात्र गाठण्यात अपयश आलं आहे. मात्र याला पूर्णपणे नाही परंतु बऱ्याच प्रमाणात अपवाद ठरलं ते "मराठा सेवा संघ' नावाचे संघटन. मराठा सेवा संघाने या 32 वर्षात महामानवांचा विचार डोक्यात  घेऊन प्रबोधनाला पंचसूत्री (शिक्षण, अर्थसत्ता, धर्मसत्ता, राजसत्ता, प्रचार - प्रसार माध्यम सत्ता ) या संस्थात्मक कार्याची जोड देण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करत आहेत. त्यात उल्लेख करण्यासारखे म्हणजे राज्याच्या उपराजधानीचे ठिकाणी, बहुजनांच्या नाग संस्कृतीचे शहर, दिक्षा भूमी असलेले म्हणजेच नागपूरला गेल्या बत्तीस वर्षांपासून संघटनेचे मुखपत्र "मराठामार्ग" हॆ मासिक अनेक अडचणींना समोर जात सुरु आहे. कुणबी -मराठा, बहुजनांच्या मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रातीत संशोधन करता यावे म्हणून नव्यानेच जागतिक पातळीची "बळीराजा संशोधन संस्था स्थापन करण्यात आली आहे. राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची चावी असं गृहीत धरून, आपल्या विचाराच्या झेंड्याला आपलाच दांडा असावा म्हणून "संभाजी ब्रिगेड" या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कुणबी -मराठा, बहुजनाना धार्मिक रित्या भावनिक करून धर्माची सर्व सूत्र आपल्या हातात ठेवून बहुजनांची लूट जे पुरोहित करत आहेत त्यांच्या गुलामीतून स्वतंत्र करण्याकरिता "शिवाधार्माची" स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रातील 30 -32 जिल्ह्यात संघटनेचे ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र, विद्यार्थी वसतीगृह, पतसंस्था, स्वतःच्या ईमारतीत स्थापन करण्यात आले आहे. संभाजी ब्रिगेडच्या डोक्याच्या तेल मॉलिश पासून ते पायाच्या बूट पॉलीस पर्यंतचा कोणताही व्यवसाय करण्याच्या आव्हानातून अनेक तरुणांनी उद्धयोग उभारून अनेकांना रोजगार दिलेत. राज्यभर संघटनेने निर्माण केलेले दहा हजार वक्ते, शाहीर, प्रबोधनकार, कीर्तनकार, लेखक आणि लाखो वाचक आहे. सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा   या राष्ट्रमाता जिजाऊच्या  जन्मस्थळी बारा हजार कोटीची भव्य जिजाऊ सृष्टी उभारल्या जात आहे. (आर्थिक मदतीची गरज आहे ), सिंदखेड राजा येथे महिला सुपर स्पेशालिटी दवाखाना साकारल्या जात आहे. आज संघटनेच्या कार्यामुळे या देशाला अनेक प्रकारच्या इतीहासाची दडलेली माहिती  उपलब्ध झाली. अनेक प्रतिके समोर आली आहेत. जिजाऊंच्या कार्यकाळाला तीनशे वर्ष होऊन सुद्धा त्यांची फोटो रुपी अधिकृत प्रतिमा आम्हा जवळ नव्हती ती मराठा सेवा संघाने निर्माण केली. या महाराष्ट्राच्या मातीत आणि बहुजनांच्या मतीत स्वाभिमानाची बीजे निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन जयंतीचा वाद निर्माण करण्यात आला होता. तो वाद संपविवून आणि ऐतिहासिक पुराव्याच्या आधारे शासनाला महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी आहे हॆ पटवून देण्यात यश आलं आहे. अशी अनेक विधायक संस्थात्मक कार्य कमी वेळात, कोणत्याही प्रकारची सत्ता नसतांना केले आहेत.

            मित्रांनो लिहिण्यासारखं भरपूर आहे. पुढे लिहित राहू. एक मात्र, आता तरुणांकडे भविष्य म्हणून पाहिल्या जात आहे.  आता त्यांनीच पुढे येऊन मराठा सेवा संघाचा हा विचार व चळवळ पुढे न्यावी. कारण परिवर्तन तरुणचं घडवू शकतात. आता तरुणांनी न्याय मागण्या मागण्याकरिता रस्त्यावर उतरले पाहिजे. कारण...

युवा वह नही, जो हवा के साथ बहे|

युवा वह है, जो हवा का रुख बदल दे ||

म्हणून तरुणांनी सर्व मतभेद विसरून शिव -फुले- शाहू- आंबेडकर चळवळीचे  सक्रियपणे नेतृत्व करायला हवे.  समाजाचे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय प्रश्न सोडविण्यासाठी मराठा सेवा संघाचा विचार डोक्यात घेऊन काम करत राहू या.

            *मराठा सेवा संघाच्या ३2 व्या वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक सदिच्छा...*

===========  अनिल भुसारी, तुमसर जि. भंडारा ८९९९८४३९७८

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

पश्चिम-महाराष्ट्रतील बातम्या

*राज्यात १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरी होणार*

*सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र* मुंबई, दिनांक १३: छत्रपती...

*सुप्रसिद्ध मेडीसन पीआर मिडीया एजन्सी बाबत जगदिश काशिकर यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांना नोकरी वाचविण्याबाबत निवेदन व स्मरणपत्र* *कामगार आयुकत यांच्या पर्यत आपली समस्या पोहचवण्यासाठी व न्यायासाठी सुप्रसिद्ध समाजसेवक, वकील व वोचडोग फाऊंडेशन चे ट्रस्टी श्री गोडफ्रे पिमेंटा यांची घेतली कायदेशिर मदत* *दिल्ली कामगार मंत्री कार्यालयातुन या प्रकरणाबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश महाराष्ट्र कामगार आयुकत यांना देण्यात आले आहेत*

भारतीय वार्ता जगदीश का. काशिकरमुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व...

ब्राह्मण पुरोहिताची जागा बहुजन पुरोहितांना द्या! मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर

भारतीय वार्ता : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यातील वर्तमानातील युवराज्ञी संयोगिता राजे संभाजी...