वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
Reg No. MH-36-0010493
डॉ.बाबा आढाव हे नाव आता,विशेषनाम झालं आहे.गेल्या पन्नास वर्षात,पुण्यानं अनेक दिग्गज,गमावले आहेत.पर्वत रांगांतील एक-एक,शिखर कोसळत होतं.काही उरले आहेत.त्यातलं एव्हरेस्ट बाबा आढाव आहे.त्यावरुनच आता शहराची ओळख ठरते.बाबा आढावांचं पुणे,असं म्हणावं लागतं.देशभरच्या कष्टकऱ्यांना,पुण्याचं नाव सांगितलं की, "डॉ बाबा आढाव का पुना शहर ?" असा सवाल आदरानं करतात.
डॉ बाबा आढाव हे,सामाजिक रचनाकार आहेत.त्यांनी श्रमिकांच्या विस्कळीत जगाला,घोटीव आकार देऊन,एक अप्रतिम शिल्प तयार केलं आहे.त्याला चेहरा दिला आहे.जागतिक पातळीवर,डॉ बाबा आढाव यांची,दखल घेतली जात आहे.ज्यांनी बाबा आढाव यांचं,मजूर साम्राज्य पाहीलं आहे.त्यांना ठाऊक आहे की,बाबा आढाव हा एक ब्रॅण्ड बनला आहे.ज्या क्षेत्राला स्पर्श होईल,ते शोषण मुक्त होईल.याची गॅरंटी आहे.
आज इतकी वर्षे आम्ही,त्यांना पाहात आलो आहोत.तेच बाबा,तोच खणखणीत आवाज,तेच फुल्यांचे अखंड,तोच सोनचाफा,तोच पोशाख फक्त आता,लॅम्ब्रेटा स्कूटर नाही.तरीही उंचीवर पोहचलेल्या,प्रत्येकाला वाटतं की,काहितरी उणीव,राहिली आहे.
नानासाहेब गोरे एकदा म्हणाले होते की,"डोळ्यासमोर अनेक गोष्टीची पूर्तता होऊनही,काहीतरी उणीव भासतेच आहे.स्वातंत्र्य चळवळीत होतो,स्वातंत्र्य मिळालं.गोवामुक्ती आंदोलनात होतो,गोवा मुक्त झाला.संयुक्त महाराष्ट्र चळवळ,भाषावार प्रांतरचना यासाठी लढलो,मुंबईसह महाराष्ट्र मिळवला.नामांतर चळवळीत सहभागी झालो होतो,मराठवाडा विद्यापीठ नामांतरही झालं.मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी आग्रह धरला,आयोगाची अंमलबजावणी झाली.तरीही उणीव जाणवतच होती"
नानासाहेबांना अखेरच्या काळात,बाबरी मशीद पाडल्यानं,जो धक्का बसला होता.त्याचं शल्य अखेरपर्यंत,बोचत होतं.कुलदीप नायर म्हणतात की,गांधीजींना गोळी ३० जाने १९४८ ला लागली होती.पण मृत्यू ! बाबरी ढासळली,अन् बापू कोसळले.
डॉ बाबा आढावही आज कोणत्याही कार्यक्रमात गेले तरी,एकच खंत व्यक्त करतात की,देशात चौकाचौकात,देवांच्या टपऱ्या आहेत.पण "घटना घर" का निर्माण होत नाही ? तशी प्रत्यक्षात बाबांनी सुरुवात केलीही.पण भारतीय नागरिक "घटना साक्षर" नाही,ही त्यांची खंत आहे.
बाबांच्या एकूण कार्याचे टप्पे,एका लेखात सांगता येणार नाहीत.पण बाबांनी फार मोठी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे.ती सांगितली नाही तर,बाबा अपूर्ण राहतील.डॉ बाबांची सुरुवात,पाठ विकणाऱ्या हमालांच्या,हालाखीपासून,सुरु झाली होती.बाबा डॉक्टर झाल्यानंतर,भवानी पेठेतील वस्तीत,दवाखाना चालू केला होता.तिथंच श्रमिकांसाठी,रात्र शाखाही चालायची.त्यात बरेचसे मालवाहतूक करणारे हमाल होते.ते बाबांकडं उपचारासाठी येत,तेव्हा प्रामुख्यानं ते मानदुखी,कंबरदुखी,गुडघेदुखीनं बेजार झालेले असायचे.हमालांचं जीवन अतिशय कष्टाचं आणि हलाखीचं होतं.बैलगाडीला जुंपलेल्या,बैलजोडीबरोबर हमालाची तुलना व्हायची.वेगवेगळ्या खेड्यातून,ही माणसं पोट भरण्यासाठी,आलेली होती.
हमाल कोणाचे मजूर नव्हते,त्यामुळं त्यांचेही कोणी मालक नव्हते.त्यांच्या कामापोटी त्यांना,गिऱ्हाईकांकडून मोबदला मिळायचा.हमालांसाठी कोणताही कायदा नव्हता.कामाचे ठराविक तास नव्हते,वेळ नव्हती.काम नसेल तर रोजगारही नाही.कामाची हमी नव्हती.स्वतःला चरकात घालायचं,व्यापारी रस काढून घ्यायचे,हमालाचं रुपांतर चिपाडात झालं होतं.हमालांना रोज मरुन,उद्यासाठी नवा जन्म घ्यावा लागत होता.बाबा आढावांना त्यांची पिळवणूक दिसत होती.हमालांना संरक्षण मिळावं,चांगलं राहणीमान मिळावं.ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.त्यातूनच १९५५ साली,हमाल पंचायत स्थापन केली होती.सुरुवातीला हमालीच्या दरात,वाढ मिळवून देणं,त्याच्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणं.ही उद्दिष्टं होती.सुरुवात भुसार बाजारातून झाली होती.हळूहळू विखुरलेल्या श्रमिक जगात,ही वार्ता झिरपत गेली.रेल्वे गोडाऊन्स,तिथले मालधक्के इथपर्यंत चळवळ पोचली होती.नंतर ट्रान्सपोर्ट व्यवसाय,मार्केट कमिट्या,कृषीउत्पन्न बाजार समित्यांपर्यंत,पंचायतीचं आंदोलन पाझरत गेलं होतं.सरकारी गोडाऊन वरील हमालांच्या अंगातही,बाबा येऊ लागले होते.हमालांच्या कामाला कायदेशीर स्वरूप,मिळून पगारवाढ होण्याच्या दृष्टीनं,शिक्कामोर्तब झालं होतं.हमाल तरुणपणात शरीराची ताकद विकून,पडत्या काळात,त्याच्या शरीराचा पिंजरा झालेला असतो.भविष्याबाबत सुरक्षितता मिळू शकेल,अशी सुविधा.त्याचबरोबर प्रॉव्हिडंट फंड,ग्रॅच्युइटी,कामाचे ठराविक तास,शारीरीक अपघात नुकताच भरपाई,असे अनेक मुद्दे बाबांनी,आपल्या पोतडीतून बाहेर काढले होते.मानवतेच्या पातळीवर कोणीही,त्याला नकार देत नव्हतं.पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळं,त्याला रेटा कमी पडत होता.संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यावर मात्र,पंचायतीच्या कामाला जोर आला होता.मुळातच बाबा आढाव हे उचापती आणि कल्पक होते.त्यामुळंच मंत्र्यांच्या गाड्या,अचानक अडवणं,रस्त्यावर आंदोलनं करणं,जेलभरो आंदोलनं करणं,हे एका बाजूला सरकारवर दबाव आणण्यासाठी चाललं होतं.दुसऱ्या बाजूला काटा बंद आंदोलन करुन,व्यापाऱ्यांवर दबाव आणला जात होता.हमाल नसतील तर,व्यापारी पेठांचं काम ठप्प व्हायचं.
नवीन स्थापन झालेल्या,महाराष्ट्र सरकारला हा प्रकार,नवीन होता.आणि व्यापाऱ्यांनीही,असं काही घडेल याची कल्पनाही केली नव्हती.पण सरकारच्या गळी,एक गोष्ट उतरली होती.की हमाल पाठ विकतो,त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे.निदान गेलेली ताकद,गाळलेला घाम याचं तरी भान,सरकारनं ठेऊन,कायदा करावा यासाठी,बाबांचा आटापिटा चालला होता.१९६९ साली बाबांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झालं होतं."महाराष्ट्र माथाडी,हमाल व इतर श्रमजीवी कायदा" सरकारनं संमत केला होता.पंचायतीच्या पंधरा वर्षांच्या,अव्याहत संघर्षाला यश मिळालं होतं,पण व्यापाऱ्यांना हे रुचलं नव्हतं.श्रमाला प्रतिष्ठा मिळावी,अशी त्यांची मानसिकता नव्हती.त्यांनी याविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती.मात्र उच्च न्यायालयानं,१९८० साली व्यापाऱ्यांचं आव्हान फेटाळलं आणि,कायद्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला होता.दर तीन वर्षांनी हमालांना,दरवाढ मिळते.हमालीचेही नाना प्रकार आहेत.पंधरा ते वीस प्रकारचे हमाल आहेत.माल उतरवून घेणारे हमाल,मालाची वाहतूक करणारे हमाल,पोत्यांची थप्पी लावणारे हमाल,पोती उघडणारे हमाल या वर्गवारीनुसार,त्यांना वीस ते पंचवीस टक्के,वाढवून मिळतात.
दरम्यानच्या काळात डॉ बाबा आढाव,नगरसेवकही होते.महानगरपालिकेत नानासाहेब परुळेकरांनी स्थापन केलेल्या,नागरीक संघटेचे सभासद होते.त्यामध्ये जवळपास सर्वच समाजवादी होते.नानासाहेब गोरे,एसेम जोशी,भाई वैद्य,मधुकर निरफराके,केशवकांत जानजोत,मोतिराम केशव कल्याणकर,नरेंद्र मलकाजी चिल्लाळ,सयाजीराव साळुंके,निळुभाऊ लिमये अशी बरीच मंडळी,नगरसेवक होती.
डॉ बाबा आढाव यांनी,लोकसभेची उमेदवारीही केली होती.परंतु थोड्या मतांनी,कॉंग्रेसचा उमेदवार विजयी झाला होता.बाबांचे त्यावेळपासूनचे सहकारी,दत्ताजी काळेबेरे म्हणतात,की "बाबांना निवडणूकीत,अपयश आलं,ती चळवळीसाठी इष्टापत्तीच होती".ते खरंही आहे.कारण भारतीय श्रमिक जगात,बाबांकडून नवा इतिहास घडविला गेला आहे.हाताला काम आणि कामाला दाम,मग हक्कानं प्रबोधनही केलं.त्याचबरोबर जेधे-जवळकर,यांच्या ब्राम्हणेतर चळवळीत,किमान पन्नास वर्षे,खंड पडला होता.डाॅ बाबा आढाव,डॉ.य.दी.फडके,गेल ऑमव्हेट यांच्यामुळं,बहुजन चळवळ पुन्हा,नव्या जोमानं सुरु झाली आहे,तिचं वटवृक्षात रुपांतर झालं आहे.त्यामुळंच आज मनुवाद्यांना,बहुजन समाजात शिरकाव करता येत नाही.
१९८० साली महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कायद्यावर,न्यायालयानं शिक्क्याची,मोहर उमटवल्यावर,बाबांना हुरुप आला,चळवळ जोम धरू लागली होती.त्याच दरम्यान मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनानं,जोर धरला होता.त्या चळवळीचा केंद्रबिंदू,डॉ बाबा आढाव होते.महाराष्ट्रभर उद्रेक झाला होता.दलित विरुद्ध मराठा,अशी सामाजिक दुफळी,प्रत्यक्षात मैदानावर दिसू लागली होती.तोपर्यंत ओबीसी समाज विशेषतः,माळी समाज चळवळीत,उतरला नव्हता.शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या,तो मराठा समाजाला ओलांडून पुढं चालला होता.मनातल्या मनात,स्वतःला उच्च वर्णीय मानून,फुले हे महारा-मांगांचे नेते होते.असं स्पष्टपणे म्हणणारे,आमचे अनेक सवंगडी शाळेत होते.बाबांनी आंदोलन सुरु केलं होतं.त्यामुळं महाराष्ट्र राज्यातही,आणखी एक उपेक्षित राज्य नांदत आहे.हे प्रत्यक्ष पडद्यावर, स्पष्टपणे दिसलं.
त्याचवेळी आषाढी निमित्तानं,पंढरपूरला येणाऱ्या दिंडीतील,विषमता आणि भेदभावही,बाबांनी चव्हाट्यावर आणला होता.आळंदीच्या दिंडीमध्ये आणि चांभार समाजाच्या दिंडीमध्ये,शिवताशिवत होऊ नये म्हणून,एक घोडी खुबीनं आड ठेवली होती.ती जातीतील भिंत बाबांनी आंदोलन छेडून,तोडून टाकली होती.डॉ.बाबा आढाव ज्या भागात राहात होते.तो भाग,महात्मा फुल्यांनी,पेरलेल्या बियांनी भरलेला होता.तरीही विठ्ठल रामजींनंतर,चळवळ पन्नास वर्षे,थांबली होती.पण बाबा आढाव,हे उगवलेलं रोपटं कोडगं होतं.सर्व मोसमात,त्याचं "सिझनिंग" झालं होतं.बाबांच्या अंगात फुलेच संचारले होते.१८७३ साली महात्मा जोतीराव फुल्यांनी,स्थापन केलेल्या सार्वजनिक सत्यधर्माचं,शताब्दी वर्ष १९७३ साली होतं.डॉ बाबा आढावांनी "महात्मा फुले समता प्रतिष्ठान" असं नामकरण करुन,समतेची प्रतिष्ठापना केली होती.एकप्रकारे पुण्यातील मनुवादी पेशव्यांना,आपल्या कृतीने,इशारा दिला की,
"हे असे आहे पण,हे असे असणार नाही"
"दिवस आमचा येत आहे,तो घरी बसणार नाही"
(सुरेश भटांचे ऋण मानून)
त्याआधी त्यांचेच सहकारी साहित्यिक,हमीद दलवाई यांनी,मुस्लीम सत्यशोधक मंडळ,स्थापन केलं होतं.
बाबांच्या या धाडसाबद्दल नानासाहेब गोरे म्हणाले होते की,"महात्मा फुल्यांना निदान,ब्रिटीशांच्या कडक कायद्याचं,पाठबळ तरी होतं.पण बाबांना स्वतंत्र भारतातच,प्रचंड विरोधाला तोंड द्यावं लागत आहे."
नानासाहेब म्हणाले ते खरं आहे.कारण बाबांचं कर्तृत्वच,एवढं मोठं आहे की,फुल्यांनी त्यांच्यावर फुलांची पखरण केली आहे.म्हणून सोनचाफ्यांच्या फुलांची ओंजळ,दररोज त्यांच्या हाती असते.अखंड म्हणातानाही,त्यांच्यात जोतीराव गोविंदराव फुले संचारतात.पन्नास वर्षांत,सूर इतका वळणदार झाला आहे की,प्रत्येक ओळीला एक झकास,गिरकी घेऊन,पुन्हा मूळ रस्त्यावर येतो.
आपल्या समाजात कर्तृत्वाला,मोजताना जातीच्या टोल नाक्याखालून,जावं लागतं.तेथून मान्यतेचा,दाखला मिळाल्या खेरीज,तुम्हाला सीमेच्या आत प्रवेश नाही.त्यामुळं जागतिक पातळीवर बाबांची दखल घेऊनही,सीमेच्या आत त्यांना,मान्यता मिळाली नव्हती.
कायद्याची अंमलबजावणी सुरु झाल्यावर.त्यांना हमालांच्या व्यसनांकडं,आणि कष्टाच्या जीवनशैलीमुळं उद्भवणाऱ्या आजारांकडं,लक्ष देणं शक्य झालं होतं.महिलांची आहाराबाबत उदासीनता,त्यातून होणारे आजारही,त्यांच्या नजरेतून सुटले नव्हते.
आज पंचायतीचं महामंडळ आहे.वीस वर्षे होऊन गेली आहेत.दोनशेपेक्षा अधिक ठिकाणी,संघटना आहेत.पुण्यात लाखभर सभासद आहेत.नागपूर-भंडाऱ्यापासून तर,कोकण-सावंतवाडीपर्यंत पाळंमुळं पसरलेली आहेत.गाव तिथं एस टी,त्याच धर्तीवर गाव तेथे "हमाल पंचायत" सुरु झाली होती.सभासद वर्गणीतून शैक्षणिक उपक्रम राबविले जातात.आरोग्यं शिबिरं आणि सामाजिक शिबिर घेतली जातात.अंधश्रध्दा निर्मूलनातून श्रमिकांचं प्रबोधनही होतं.राष्ट्रीय एकात्मता शिबिरातून,ऐक्यांची भावना निर्माण करण्याचं,मोलाचं कार्य बाबांनी केलं आहे.हमालांना एकात्मता शब्द,उच्चारता येत नव्हता तरी,बाबांनी विचारलेल्या प्रश्नांवर,हमाल म्हणायचे काही कळलं नाही,पण एवढं समजलं की,सगळ्यांचा आत्मा एकच आहे.
विषमता निर्मूलन शिबिरं,कितीतरी ठिकाणी घेतली होती.डॉ.बाबा आढाव यांच्या बाबतीत बोललं जातं की,बाबा आगाऊपणा करतात.खरं तर बाबांच्या कल्पकतेला आगाऊपणा समजतात.हे दुर्दैव आहे.या पिढीतील अनेकांना ठाऊक नसेल की,सुरुवातीला हमाल पंचायतीत,जी शिवताशिवत खदखदत होती,तिथल्या तिथं बाबांनी तंबी दिली की,भाकरी महत्वाची आहे.जात नव्हे.विशेष म्हणजे बाबांनी,कष्टकऱ्यांचं प्रबोधन केलं,आणि अन्नालाही लावलं.हे सोपं नव्हतं.इतर कामगार संघटना,केवळ श्रमिकांच्या वर्ग लढ्याची,बात करतात,पण बाबांचा कष्टकरी,खांद्याला खांदा लावून काम करतो.सुरुवातीस बाबांची,कष्टकऱ्यां समोरची भाषणं,त्यांच्याच भाषेत असत.बाबा हमालांना बोलते करीत,स्त्रियांना बोलायला सांगत होते.हा सारा नजारा अप्रुप होता.बाबाही त्यांच्याच भाषेत बोलत असत.बाबा हमालांच्या घरी जात,तेव्हा पोत्याच्या बारदान्यावर,मांडी घालून बिनधास्त,चहा प्यायचे.हालहवाल विचारायचे,दरडावून दारु सोडायला सांगायचे.हमालांना आतापर्यंत,असा गडी कधी काळी,भेटेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.याचं सारं श्रेय बाबांच्या कल्पकतेला जातं.(संघाच्या भाषेत आगाऊपणा)
बाबा नगरसेवक असताना मोतिराम कल्याणकर,सयाजी साळुंके,केशवकांत जानजोत यांनी,झोपडी संघाची स्थापना केली होती.कासेवाडी,राजेवाडी,लोहिया नगर,डायस प्लॉट या झोपडपट्टयांमधून,त्यांनी अनेक कामं केली आहेत.१९७२ च्या मराठवाड्यातील भीषण दुष्काळात,पुण्यात पर्वती पायथ्याला,एक नवीन वसाहत तयार झाली होती.सगळे रोजंदारीसाठी पुण्यात,स्थलांतरित झाले होते.आज पन्नास वर्षे झाली आहेत,आजही ते बाबांचं नाव घेतात.बाबांची एक गाव एक पाणवठा मोहीमही,मराठवाड्यातच जास्त,राबविणं गरजेचं होतं.बाबांनी ऐन दुष्काळात,मराठवाडा पालथा घातला होता.त्या अनुभवावरील त्याच नावाचं,त्यांचं पुस्तकही गाजलं होतं.
एक गाव एक पाणवठा मोहिमेच्या वेळीच,दलित पँथर या संघटनेची स्थापना झाली होती.आक्रमक दलित तरुणांनी,बुजुर्ग नेत्यांना बाजूला सारून,पारंपारिक कॉंग्रेसच्या विरोधात,भूमिका घेतली होती.पॅंथर चळवळ वेळीच फोडण्याचं काम,इथल्या मराठा नेतृत्वानं,चोख पार पाडलं होतं.त्याआधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर,यशवंतरावांनी रिपब्लिकन चळवळ फोडली होती.
२५ जून १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधींनी,राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती.कम्युनिस्ट सोडून सगळे विरोधी पक्षनेते,तुरुंगात धाडले होते.तुरुंगात जाण्याआधी डॉ.बाबा आढावांनी,हमालांसाठी फार मोठं काम केलं होतं.
१९७५ साली डॉ बाबा आढाव यांनी,"ना नफा ना तोटा" या तत्वावर हमालांसाठी "कष्टाची भाकर" योजना सुरु केली होती.हमालांच्या दिवसभराच्या कष्टांना,पुरेसं जेवण खानावळीत मिळत नव्हतं.आरोग्याच्या समस्येत,योग्य आणि पुरेसा आहार,हा महत्त्वाचा घटक आहे.चांगलं जेवण खिशाला परवडेल,अशा दरात मिळत नव्हतं.म्हणून बाबांच्या कल्पक डोक्यातून,ही योजना साकार झाली होती.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी,ही केंद्रं आहेत.वार्षिक उलाढाल एक कोटीच्या पुढं आहे.अत्यल्प दरात पोटभर जेवण इथं मिळतं.हमालांची कष्टाची जीवनशैली ध्यानात घेऊन,जास्तीत जास्त उष्मांक देणारं,सकस जेवण बनवलं जातं.यातूनच हमालांच्या अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला.हमालां व्यतिरिक्त मध्यमवर्गीय कुटुंबातील,माणसंही तिथं येऊन,अल्प दरात पोटभर जेवण करतात.तिथंला व्यापही वाढला आहे.दोन पाळ्यांमध्ये काम चालतं.हा उपक्रम सुरु करताना,परकीय देणगी न घेता,स्वकष्टावरच "कष्टाची भाकर" सुरु करण्याचं ठरवलं होतं.त्यानुसार स्वकष्टावरच हा उपक्रम,मोठा होत गेला.सरकारनं आणलेल्या अशा अनेक योजना,केव्हाच बंद पडल्या होत्या.खाजगी संस्थांनीही,असे स्तुत्य उपक्रम सुरु केले होते.झुणका भाकर केंद्र,इंदिरा कम्युनिटी केंद्र इ.पण तेही बंदच पडले होते.गेली सत्तेचाळीस वर्षे कष्टाची भाकर केंद्र चालूच आहे.ग्रामीण समाजवादी नेते,गणपतराव आवटे झेड,पी.चे उपाध्यक्ष असताना,कष्टाची भाकर केंद्रातून,जेवण घेऊन येण्यास सांगत होते.या उपक्रमाचं यश पाहून,दिल्लीमध्ये जनआहार योजनेच्या रचनेसाठी,कष्टाची भाकर केंद्रातल्या सदस्यांना,दिल्लीत निमंत्रण दिलं होतं.आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा,बोलबाला झाला आहे.
हमालांची अर्थप्राप्ती आणि खर्च याचा मेळ बसत नव्हता.कितीही काटकसर केली तरी,हातातोंडाची गाठ पडणं,कठीण होतं.मग गुंडसदृश्य खाजगी सावकारांकडून,भरमसाठ व्याजानं उसने घेऊन,फसवणूक होत होती.कष्टकऱ्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी,सावकारी पाशातून मुक्त होण्याकरिता.त्यांची पत वाढविण्यासाठी,पतपेढी सुरु करण्याची कल्पना,बाबांच्या डोक्यात आली,आणि ती प्रत्यक्ष अंमलातही आणली गेली.१९९० साली,"हमाल कामगार नागरी सहकारी पतसंस्था" उदयास आली.पतसंस्थेत हमाल आणि त्यांची मुलंच कामाला आहेत.तिथं कार्यालयीन कामाचं विभाजनही,व्यवस्थीत केलेलं आहे.पतपेढीत सामील होण्यासाठी,प्रत्येकी दहा हजार रुपयांचे,शेअर घेता येतात.हमालाचे कामाचे दिवस पाहून,त्याची पत पाहून,ग्रॅच्युइटी पाहून कर्जवाटप होतं.सुरुवातीला प्रगती पथावर असलेल्या सदस्यांना,दुचाकी वाटपही केलं होतं.पतसंस्थेचं भांडवल आणि कर्जवाटप, कोट्यवधींच्या,पुढं गेलेलं आहे.हमालांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी,कर्ज दिलं जातं.संस्थेचे सभासद हजारो श्रमिक आहेत.पतसंस्थेच्या लाभांशाचं वाटपही करण्यात येतं.
हमाल-कष्टकऱ्यांची मुलं,पुण्यासारख्या शैक्षणिक राजधानीत,राहात असलल्यानं त्यांच्या,शैक्षणिक आकांक्षाही,उंचावत राहाणं स्वाभाविक होतं.बाबा आढाव महात्मा फुल्यांचा वारसा चालवत आहेत,शिक्षण क्षेत्रात मागं कसे राहतील ? हमाल पंचायतीनं त्या क्षेत्रातही पाऊल टाकलं.जून २००० मध्ये,"हमाल पंचायत कष्टकरी विद्यालय" सुरु करण्यात आलं.सुरुवातीपासूनच सर्व शैक्षणिक सुविधा,उपलब्ध झाल्यामुळं,जिल्हा परिषदेची मान्यताही,लगेच मिळाली.महात्मा फुल्यांनी दीन-दुबळ्यांसाठी,शिक्षणाची कवाडं खोलून,पावणेदोनशे वर्षे होतील.तरीही कष्टकऱ्यांच्या मुलांना,इतर शाळेत प्रवेश दिला जात नव्हता.त्यातूनच हे विद्यालय उभं राहिलं.पण तेथे कष्टकऱ्यांच्या मुलांबरोबरच,इतर मुलांनाही प्रवेश दिला जातो.जवळपासच्या झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणाची,सोयही झाली आहे.सुरुवातीला या विद्यालयासाठी,हमाल भवनाचे दोन मजले,देण्यात आले होते.दहा वर्षांपूर्वी शाळेसाठी,नवीन इमारतही तयार करण्यात आली.बालवाडीही हमाल पंचायतीच्या,शाळेशीच संलग्न आहे.शाळेचा कर्मचारी वर्ग,शिक्षक वर्ग सरकारी नियमानुसार,नेमणूक करण्यात आलेला आहे.आधुनिक शिक्षण कॉम्प्युटर अभ्यासक्रमासह,देण्यात येतं.
बाबा आढावांनी समस्येचं टोक,हातात धरून गुंतडा,नेमका सोडवला होता.हमालांच्या जीवनाचा इतका गुंतडा झाला होता की,सुरुवातीलाच जर सगळेच प्रश्न,खेकसून अंगावर आले असते तर,ते सोडविण्याऐवजी,गुंतड्याचं भेंडोळं फेकूनच दिलं असतं.
हमाल कोठेही राहात होते.काहीजण तर हातगाडीवरच झोपायचे,बहुतेकांनी झोपडपट्टीचा आश्रय घेतला होता.स्वतःचं घर असावं,असं हमालांनाही वाटत होतं.पंचायतीच्या कामातून,मुलांनी शहरात शिकावं,या हेतूनं ही कुटुंबं,पुण्यात स्थलांतरित झाली होती.मग बाबांनीच पुढाकार घेऊन,पुण्यात गुलटेकडी येथे "हमाल नगर योजना" अंमलात आणली.गुलटेकडीच्या मार्केट यार्डच्या मागील बाजूस,हमाल नगर वसविण्यात आलं.१९७९ साली,शासनाकडून ही जागा मिळविण्यात आली होती.१९७७ च्या काळात उकिरड्यासारखी वाटणारी ही जागा,आज पुण्यातील उच्चभ्रू वस्तीजवळ आहे.कमीत कमी प्रदूषण असलेलं,हमाल नगर हे घामाचं आणि श्रमाचं,आनंद भुवन आहे.पहिल्या टप्प्यात चौतीस घरं,तर दुसऱ्या टप्प्यात तीनशे अठ्ठयाऐंशी घरं,या योजनेतून बांधण्यात आली होती.त्याच्या आधी "हमाल भवन" ही दिमाखदार वास्तू,१९७७ साली बांधून तयार झाली होती.तीचं उद्घाटन केंद्रीय उद्योगमंत्री आणि मजदूर नेते,जॉर्ज फर्नांडिस यांच्या हस्ते,करण्यात आलं होतं.हा हमाल पंचायतीचा,थोडक्यात इतिहास आहे.बाबा आढाव हे प्रकरण,एवढ्यावरच थांबलं नाही.रिक्षा चालक-मालकांनी बाबांना,विनंती करुन रिक्षा पंचायतीची मुहूर्तमेढ रोवली.तेही कष्टकरीच त्यांच्याही समस्यात,लक्ष घातले.त्यांचीही आज रिक्षा पंचायतीची पतपेढी आहे.त्यांना स्वतःच्या पतिवर कर्ज मिळणं.आरटीओ,ट्रॅफिक पोलिसांकडून होणारा त्रास कमी झाला.रिक्षा चालकांनाही वळण लागलं.कचरा वेचकांनीही,पंचायतीला १९९३ साली,संलग्न करुन घेतलं आहे.कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायतीनं,एक शक्कल लढवली,भंगार माल दुकानदारांना देण्यापेक्षा,पंचायतीनंच स्वतःचं दुकान,का खोलू नये ? तसं झालंही त्यातून कमाई,चांगली होऊ लागली,मापा-वजनात ढापाढापी थांबली.२०१० साली नफ्यातून,चक्क बारा टक्के बोनस दिला होता.पंचायतीची मोलकरीण संघटना,असंघटित मोलकरणींना,संघटीत करण्याचं काम सोपं नव्हतं.पण पंचायतीच्या ब्रॅण्डनं ते शक्य झालं. वापरलेलं जळकं ऑईल गोळा करणाऱ्यांचीही,संघटना पंचायतीशी संलग्न आहे.
डॉ.बाबा आढावांचा संघर्ष,१९५५ पासून सुरु झाला होता,तो आज वयाच्या ९३ व्या वर्षात पदार्पण करतानाही चालूच आहे.डॉ.बाबा आढाव लोहियांचे शिष्य,डॉ राममनोहर लोहिया हे स्वतः कल्पक होते.डॉ बाबा आढाव हे परिवर्तनवादी चळवळीतील,एक मिनार आहे.सामाजिक प्रबोधन आणि श्रमाला प्रतिष्ठा,हे ब्रीद घेऊन उतरलेले बाबा आढाव.आज परिवर्तनवादी कार्यकर्त्यांसाठी,विसाव्याचा वटवृक्ष आहे.विरोधक त्यांच्या पोटतिडकीला आक्रस्ताळेपणा म्हणतात.तर कल्पकतेला आगाऊपणा म्हणतात.काहीही म्हणोत बापडे,पण एक गोष्ट स्पष्ट दिसत आहे की,आज बहुजनांच्या चळवळीला,जी वळवळ प्राप्त झाली आहे.त्याचं श्रेय निःशंकपणे,डॉ बाबा आढाव यांच्याकडं जातं.जेधे-जवळकरानंतर जी चळवळ,आळून घट्ट बनली होती.तिला उब देऊन,प्रवाही करण्याचं मोलाचं कार्य,बाबांनी केलेलं आहे.आजची बहुजन चळवळ म्हणजेच,स्वातंत्र्यपूर्व काळातील,ब्राम्हणेतर चळवळ होय.
बाबांचं एक वैशिष्ट्य आहे की,एकेकाळचे नकारात्मक वाटणारे बाबा आढाव,आज ते इतर कोणाही समाजवाद्यापेक्षा,जास्त सकारात्मक आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी,या दोघांचाही समतोल साधणारे फक्त बाबाच आहेत.एक गाव एक पाणवठा,हे चळवळीवरील मी वाचलेलं पहिलं पुस्तक होतं.त्यानंतर बाबांनी लिहलेली छोटी पुस्तिका,संघाची ढोंगबाजी ही देखील वाचली.बाबा बोलणं लिहतात,हे तेव्हा समजलं होतं.बोलणं लिहणं सोपं नाही.बाबा पुस्तकातून वाचकांशी,थेट संवाद साधतात.बाबांनी फार कमी लिहिलं,पण जगणं लिहिलं आहे,हे वैशिष्ट्य.देवदासींसाठी काम करताना,महाराष्ट्र आणि बेळगावात,विरोध झाला होता.परंतु अंधश्रद्धा ही वैज्ञानिक कसोटीवर,फार काळ टिकत नाही.१९१० साली म्हैसूर संस्थानानं देवदासी विरुद्ध,कायदा केला होता.१९३४ साली मुंबई प्रांतान असा कायदा केला होता.तर १९४७ साली मद्रास प्रांतात,असा कायदा बनविला होता.पण धडपणे अंमलबजावणी होत नव्हती.१९७५ साली बाबांनी गडहिंग्लज येथे,महात्मा फुले समता प्रतिष्ठान तर्फे,देशातील पहिली देवदासी परिषद भरवली होती.तिला यश लाभले ते,बाबांनीच देवदासींतून नेतृत्व तयार केल्यामुळं.
धरणग्रस्त शेतकऱ्यांचा लढा उभारणारे बाबा आढाव,शेतीमालाला भाव मिळावा म्हणून झुंजणारे बाबा आढाव,आज किती शेतकरी नेत्यांना ठाऊक आहेत ? असंघटित आणि असुरक्षित कामगारांना,न्याय मिळवून देण्याचं काम,महाराष्ट्रात फक्त बाबांनीच केलं आहे.कारण असंघटित कामगारांना,संघटीत करणं हाच मुळी एक,उरफोडीचा धंदा आहे.त्यात कोणत्याही नेत्याला,वेळ वाया घालवायचा नव्हता.कारण ट्रेड युनियन्सही आता एक इंडस्ट्री झाली आहे.
परिवर्तनाचं एकही अंग असं नाही,की गेल्या पन्नास वर्षांत,बाबांचा त्याला स्पर्श झाला नाही.बाबांनी पहाडाएवढं कार्य करुन ठेवलं आहे.तेही समाज प्रबोधन आणि,श्रमाला प्रतिष्ठा मिळावी यासाठीच.
बाबांनी जे विविध क्षेत्रात केलं आहे,तेच कुणाला एका क्षेत्रातही,शक्य होईल,की,नाही शंकाच आहे.डॉ.बाबा आढावांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या नादात,श्रमिकांचं एक आदर्श राज्यच,स्थापिलं आहे.तिथं चालते फक्त हमालांची सत्ता,आणि त्या हमालशाहीचे पंतप्रधान आहेत,डॉ बाबासाहेब पांडुरंग आढाव.
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
वणी : अवैधरित्या वाळू ची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभाग व डीबी पथकाने वेगवेगळी कार्यवाही करून ट्रॅक्टर...
सिरोचा येथे फुले, शाहू, आंबेडकर महोत्सव व्येकटेश चालुरकरतालुका प्रतिनिधी अहेरी अहेरी सिरोंचा या देशात शिव, फुले,...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...