जगद्गुरू तुकोबाराय : विचार करायला सांगणारे संत
जगद्गुरू तुकोबाराय : विचार करायला सांगणारे संत
- डॉ. बालाजी जाधव,औरंगाबाद
या देशातली वैदिक व्यवस्था आपण जे सांगू तेच खरं मानायला आणि त्याच्यावरच विश्वास ठेवायला सांगत आलेली आहे. या व्यवस्थेच्या विरोधात मध्ये कोणी 'ब्र'सुद्धा उच्चारू नये अशी तरतूद विविध धर्मग्रंथांच्या माध्यमातून या लोकांनी केलेली आहे. याचा फटका बहुजन समाजातल्या सर्वांनाच आणि संतांना सुद्धा बसलेला आहे. अगदी जगद्गुरू तुकोबाराय सुद्धा यांच्या कचाट्यातून सुटले नाहीत. नव्हे त्यांना तर _*'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग | अंतर्बाह्य जग आणि मन ||'*_ असे म्हणत सातत्याने लढा द्यावाच लागला. खरंतर वैदिक व्यवस्था आणि मनुवादी बगलबच्चे सर्वात जास्त कशाला घाबरत असतील तर ते सत्य सांगण्याला आणि लोकांच्या जागृतीला घाबरतात. कारण सत्य सांगण्यामुळे यांच्या 'शेंड्या लबाड्या' उघडकीस पडतात आणि लोकांमध्ये जागृती आल्यामुळे यांचे पोटपाणी बंद होते, यांची व्यवस्था कोलमडते. आणि म्हणूनच ते सातत्यानं बहुजन लोक अज्ञानातच असावेत असे प्रयत्न करत असतात. परंतु या देशातल्या बहुजन महामानवांचे सर्वात मोठं कार्य काय आहे हे जगद्गुरु तुकोबांनी सांगून ठेवलेलं आहे. तुकोबा म्हणतात, _*'सावध करी तुका | म्हणे निजले हो ऐका ||'*_ जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की _हे माझ्या वारकऱ्यांनो, माझ्या बांधवांनो मी तुम्हाला सावध करायला आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही सावध व्हा आणि हजारो वर्षांपासून तुम्हाला जी अज्ञानाची झोप लागलेली आहे, अंध:काराची झोप लागलेली आहे त्या झोपेचा त्याग करा._ अशा पद्धतीची जागृती करण्यासाठी जगद्गुरु तुकोबांनी समाजामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून, अभंगांच्या माध्यमातून प्रबोधनाचा जागर सुरू केला होता.
_*मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी १२ जानेवारी २०१९ रोजी आव्हान केल्यापासून २ फेब्रुवारीला जगद्गुरु तुकाराम महाराजांची जयंती जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे.*_ आज जगद्गुरु तुकाराम महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्ताने जगद्गुरु तुकोबांच्या एका वेगळ्या पैलूचा विचार या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.
बांधवांनो, खरंतर आई-वडिलांबद्दल तुकाराम महाराजांनी किती अभंग लिहिले आहेत, त्यांच्या मोठेपणाबद्दल, आई-वडिलांच्या मुलांप्रती असणाऱ्या प्रेमाबद्दल, मुलांप्रति असणाऱ्या कळवळ्याबद्दल त्यांनी भरपूर काही लिहीले आहे. इतकंच नव्हे तर *कित्येकदा सज्जन माणसाला उपमा देत असताना त्यांनी आई वडिलांची उपमा दिलेली आहे.* आई वडिलांच्या प्रेमाची जातकुळी ही _"लाभेविन प्रीती करणारी"_ असते असेही त्यांनी एका अभंगातून मांडलेले आहे. परंतु, एका अभंगात मात्र जगद्गुरू तुकोबाराय आपले आई-वडील आपल्याला जन्म देत असले, आपल्यावर कितीही प्रेम करत असले, आपलं पालन-पोषण करत असले, आपल्या लेकरांच्या भविष्याची तरतूद करत असले तरी वैचारिकरित्या आई-वडिलांना आपल्या लेकरांचं हित कशामध्ये आहे हे समजत नाही असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. आई वडील हे हजारो वर्षापासून चालत आलेला लौकिक व्यवहार, लौकिक परंपराच आपल्या मुलांना पुढे चालवायला सांगतात. ते भल्या बुऱ्याचा
पहिल्यांदा तो अभंग काय आहे हे आपण पाहू या -
हित नाही ठावे जननी जनका I
दाविला लौकिकाचार तिही II
आंधळ्याचे काठी लागले आंधळे I
घात एकावेळे पुढे मागे II
न धरावी चाली करावा विचार I
वरील आहार गळी लावी II
तुका म्हणे केला निवाड़ा रोकड़ा I
राउत हा घोडा हातोहाती II
या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्पष्टपणे म्हणतात की आपले जे आई-वडील आहेत आपले चे जनक- जननी आहेत, जन्मदाते आहेत तरीही त्यांना आपल्या पाल्याचं हित कशात आहे हेच कळत नाही. खरंतर एकीकडे
*'बाप करी जोडी | लेकुराचे ओढी | आपली कुरवंडी | वाळवुनी ||'* अशा पद्धतीचे अभंग लिहित जगद्गुरु तुकोबांनी आपले आई-वडील हे आपल्याला *'एकाएकी केला मीरासीचा धनी'* असं म्हणतात किंवा *'तुका म्हणे नेदी गांजी आणिकांसी | उदार जीवाशी होई आपुल्या ||'* आपल्या जीवावर उदार होऊन आपल्या पाल्याचं रक्षण करतात असं म्हणतात. मग या अभंगाच्या पहिल्या चरणात मात्र तुकोबाराय आपल्या मुलाचं हित कशामध्ये आहे हे आपल्या जननी- जनकाला कळत नाही असं का म्हणत असावेत? याचं कारण असं आहे की आई-वडिल मुलांवर कितीही प्रेम करत असले तरी ते प्रेम एका अर्थाने आंधळ असतं असं त्यांना म्हणायचं आहे. कारण हे आई-वडिल काय करत असतात तर हजारो वर्षांपासून ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्याच परंपरा आपल्या मुलांवर लादण्याचं काम करत असतात. तेच व्यावहारिक आचरण करण्याचा उपदेश करत असतात. तुकोबाराय म्हणतात की आंधळेपणाने तुम्ही आपल्या आई वडिलांनी दिलेल्या परंपरेचा स्वीकार करू नका. कारण त्यांनीही त्या आपल्या आई-वडिलांकडून आंधळेपणाने स्वीकारलेल्या असतात. मग आपण जर आंधळ्याच्या मागोमाग चालायला लागलो तर निश्चितपणे आपला घात झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आंधळा मनुष्य आपला नेता होऊ शकत नाही, आपला मार्गदर्शक होऊ शकत नाही, आपला मुक्तिदाता होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर आंधळ्याचा पाठी आंधळे होऊन लागले, कसलाही विचार न करता त्याच्या मागे चालू लागले तर निश्चितपणे तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही असे तुकोबारायांनी स्पष्टपणे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. येथे आंधळे म्हणजे दृष्टी नसलेले असा अर्थ नसून नजर नसलेले असा अर्थ आहे.
बांधवांनो, आपण सर्वजणच परंपरावादी असतो. हजारो वर्षापासून ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या केवळ आपले आई-वडील करत होते, आजी-आजोबा करत होते किंवा आपल्या अवतीभोवती असणारा समाज सुद्धा ह्याच परंपरा पाळत असतो म्हणून आपण सुद्धा या सर्व परंपरा डोळे झाकून पाळत असतो. परंतु तुकोबाराय म्हणतात की हजारो वर्षापासून चालत आलेल्या रूढी आहेत त्या आपण जशाच्या तशा स्वीकार करण्याची गरज नाही. तर तुम्ही त्यांचा विचार करा. याचे कारण तुकोबारायांनी तिसऱ्या चरणामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे. *न धरावी चाली...* चाली म्हणजे काय? तर परंपरा, रूढी. या रूढी-परंपरा तुकोबांनी जशास तशा स्वीकारू नका असे स्पष्टपणे सांगितले आहे. तुमच्याकडे असणाऱ्या सद्सद्विवेकबुद्धीचा आधार घेत या सर्वांची चिकित्सा करायची आहे आणि मगच त्या स्वीकारायच्या किंवा नाकारायच्या आहेत. ' विवेक ' या शब्दाचा अर्थच ' निवडणे ' असा होतो. आता ज्या वेळेस आपण दळण निवडतो त्यावेळेस दळण चांगलं करण्यासाठी आपण त्यातले खडे काढून बाजूला फेकतो. खडे हे टाकाऊ आणि हानिकारक असतात हे आपल्याला माहिती आहे. जो विवेक दळण निवडताना जागा असतो तो विवेक परंपरा निवडताना मात्र कुठे जातो याचा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे. *' निवडावे खडे | तरी दळण वोजे घडे || '* ... खडे निवडल्या शिवाय दळण चांगलं होणार नाही हे आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून आजचा जो युवक आहे त्याने आपला *'नीरक्षीर विवेक'* जागा ठेवावा असे तुकाराम महाराजांना वाटते. *"निवडी वेगळे क्षिर आणि पाणी | राजहंस दोन्ही वेगळाली ||"* पाण्याला बाजूला करून जे दूध आहे ते घेण्याचं काम राजहंस करतो तर आपण सुद्धा असे *विवेकी राजहंस* झालं पाहिजे अशी तुकाराम महाराजांची भावना आहे. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की *'करावा विचार'*.
आता जर आपण विचार केला नाही तर नेमकं काय होतं? याचे उत्तर देताना तुकोबाराय लिहितात, *' वरील आहार गळी लावी '.* तुकोबांचे हे चरण अत्यंत महत्त्वाचे आहे. आहार म्हणजे खाद्य पदार्थ, भोजन आणि गळ म्हणजे 'मासे धरण्याचा लोखंडी आकडा' या गळाचा आधार घेत आपण मासे पकडतो. गळाला मासा लावण्यासाठी त्याला माशाचा आहार, एखादा खाद्य पदार्थ, विशेषत: माशाला आवडणारा खाद्यपदार्थ लावला जातो आणि त्यानंतर तो गळ पाण्यामध्ये सोडला जातो. आता हजारो वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे की गळाला चिकटलेला खाद्यपदार्थ दिसला रे दिसला की त्याच्यावर तुटून पडायचं. पुढचा मागचा कसलाही विचार करायचा नाही, विवेक जागा ठेवायचा नाही. परंतु त्या खाद्य पदार्थाच्या आमिषाने मात्र माशांचा बळी जातो. त्यांचा घात होतो. ही शेकडो वर्षांपासून ते आजपर्यंतची परंपरा आहे. केवळ विचार न करता परंपरा स्वीकारण्याने माशांचा घात होत आलेला आहे. आपले हीत साधावायचे असेल तर रूढ व्यावहारिक चाल न धरता विचार करायला हवा पण मासे मात्र असा विचार करतच नाहीत. केवळ त्या खाद्य पदार्थाच्या अमिषाला बळी पडतात. अशा अविवेकी माशांचं उदाहरण तुकोबारायांनी मुद्दामच दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की, ' बाबा रे बघा हजारो वर्षापासून जी गळ टाकण्याची परंपरा आहे; त्या परंपरेला मासे भुलतात कारण त्यांचं लक्ष त्या आहाराकडे जातं. पण त्याच्या मागे लावलेला गळ त्यांना दिसत नाही. कारण तेवढी विचारशक्तीच त्यांच्याकडे नसते किंबहुना ते विचारच करत नाहीत. गळ आणि मासा असा दृष्टांत देवून तुकोबाराय आपल्याला जागं करण्याचं काम करत आहेत. ते म्हणतात की तुम्ही सुद्धा जर आंधळेपणानं कोणत्याही गोष्टीचा स्वीकार केला तर तुमचासुद्धा घात झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून *' न धरावी चाली करावा विचार.'* असा उपदेश ते वारकऱ्यांना देतात.
आता या ठिकाणी परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे कशी चालत येते याचे एक उदाहरण पाहूया. एका गावात एक आंधळ जोडपं होतं. दोघाही नवरा-बायकोंना दिसत नव्हतं. आणि मग व्हायचं काय की ज्यावेळेस आंधळी बायको स्वयंपाकाला बसायची त्यावेळेस एक कुत्रा यायचा आणि त्यांच्या दूरडीमध्ये असणाऱ्या भाकरी पळवायचा. एका डोळस माणसाने ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली की एक कुत्रा येऊन तुमच्या भाकरी पळवत आहे. तेव्हा तुम्ही एक काम करा, ज्या वेळेस तुमची बायको स्वयंपाकाला बसते त्यावेळेस तुम्ही हाताने काठी आपटत बसा. म्हणजे त्या काठीच्या भीतीने कुत्रा जवळपासही फिरकणार नाही. तेव्हापासून ती आंधळी व्यक्ती ज्या ज्या वेळेस त्याची बायको स्वयंपाकाला बसायची त्या त्या वेळेस तो हातामध्ये काठी घेऊन दारामध्ये आपटत बसायचा. त्यामुळे कुत्रे घाबरायचे आणि पळून जायचे. काही दिवसानंतर त्या जोडप्याला मुलगा झाला. मुलगा मोठा झाल्यानंतर त्याचे शिक्षण पूर्ण झालं, तो इंजिनिअर बनला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचंही लग्न झालं. लग्नानंतर ज्या वेळेस त्याची बायको स्वयंपाकाला बसली त्यावेळेस हा इंजिनियर पळत घरात जावून काठी घेऊन येतो आणि दारामध्ये बसून ती काठी आपटत बसतो. तिथून एक शहाणा माणूस जात होता. त्यांने विचारलं की तू काठी का आपटत आहेस? त्यावेळी त्याने सांगितलं की *बायको स्वयंपाकाला बसली की काठी आपटने ही आमची परंपरा आहे.* मी त्याच परंपरेचे पालन करत आहे. त्या वेळेस त्या डोळस माणसाने त्याला सांगितलं की *बाबारे तुझे आई-वडील आंधळे होते, त्यांची काठी आपटने मजबुरी आणि गरज होती. पण तुला तर निसर्गाने डोळे दिले आहेत, दृष्टी दिलेली आहे. त्यात तू उच्च झालेला आहेस. तरीसुद्धा आंधळेपणाने तू आपली पूर्वीची परंपरा चालवत आहेस.* म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात *"न धरावी चाली | करावा विचार ||".*
मग आता आई-वडिलांना आपलं हीत कळत नसेल तर मग आपण विश्वास कुणावर ठेवायचा? तर तुकोबारायांनी त्याचं उत्तरही दिलेलं आहे. शेवटच्या चरणात ते म्हणतात, की मी स्वतः हा निवाडा केलेला आहे. रोकडा निवाडा केलेला आहे. राऊत (म्हणजे घोडेस्वार) आणि घोडा कोण आहे याची विवेकाने निवड केलेली आहे. त्यामुळे तुम्ही माझा निर्णय बघा आणि माझ्या मागोमाग या. माझ्या मार्गावर चाला व आपले हित साधून घ्या. एका अभंगात ते म्हणतात, *"आपुलिया हिता | असे जो जागता | धन्य माता पिता | तयाचिया ||"* ज्या मुलाला स्वतःचं हित कशात आहे हे त्याला स्वतःला कळतं, जो आपल्या हिताबद्दल जागरूक असतो त्याचे आई-वडील खरोखरच धन्य आहेत.
म्हणून जगद्गुरू तुकोबाराय हे *"विचार करायला सांगणारे, आंधळेपणाने काहीही न स्वीकारता विवेकाने निवड करायला लावणारे संत आहेत. समाजातल्या लोकांच्या विवेकबुद्धीला जागे करणारे संत आहेत."* तुकोबांनी बहुजन समाजातील लोकांना विचार करायला लावला म्हणूनच कदाचित त्यांचा सर्वात जास्त छळही झाला आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जयंतीनिमित्त *गेल्या तीस वर्षापासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि ३३ कक्ष समाजाला जागं करण्याचं, समाजाची विवेकबुद्धी जागृत करण्याचं, समाजाची तर्कबुद्धी जागृत करण्याचं आणि समाजाला विचार करायला लावण्याचं कार्य करत आहेत. आपण सुद्धा या जयंतीनिमित्त जगद्गुरु तुकोबाराय यांच्या कार्याचा आदर्श घेऊया, मराठा सेवा संघाच्या कार्याचा आदर्श घेऊया आणि आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा जागं करण्याचं, त्यांना विचार करायला लावण्याचं काम करूया. हीच खऱ्या अर्थाने जगद्गुरू तुकोबांच्या कार्याला अभिवादन ठरेल.
@ डॉ. बालाजी जाधव,औ' बाद
मो. ९४२२५२८२९०