रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
लेखक: ज्ञानेश महाराव, संपादक, साप्ताहिक चित्रलेखा
लेखक(ज्ञानेश महाराव) : अमरावती जिल्ह्यातल्या 'मेळघाट व्याघ्र प्रकल्पा'तील 'रेंज ऑफिसर' दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्र हादरून गेलाय. वरिष्ठांच्या जाचामुळे आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलीय. त्यांच्या मृत्यूनंतर वरिष्ठांसोबत झालेल्या संभाषणाची 'ऑडिओ क्लिप'ही 'व्हायरल' झालीय. यावरून सरकारी अधिकारी असलेल्या एका 'डॅशिंग महिला अधिकारी'चा व्यवस्थेमध्ये कसा छळ केला जातो, याचं भयानक वास्तव समोर आलंय. एकीकडे 'लेडी सिंघम' म्हणून दीपाली यांचा गौरव केला जात असतानाच, दुसरीकडे त्यांना वरिष्ठांच्याकडून सातत्याने अपमान सहन करावा लागत होता. त्यासंदर्भात त्यांनी वरिष्ठांकडे आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनसुद्धा परिस्थितीत फरक पडला नाही. त्यामुळे दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. व्यवस्था किती भीषण असते आणि संवेदनशील माणसांना जगणेही नकोसे करून टाकते, याची साक्ष ह्या दुर्घटनेमधून येते. खासगी असो किंवा सरकारी, अशा कोणत्याही क्षेत्रात अनेक स्त्रिया आत्मविश्वासाने काम करताहेत. अनेक स्त्रिया अधिकारपदावर आहेत. असं चित्र दिसत असलं तरी या दोन्ही क्षेत्रातल्या स्त्रियांना फार सन्मानाची वागणूक मिळते, असं मात्र अजिबात नाही. स्त्रीला दुय्यम लेखण्याची जी प्रवृत्ती आहे, ती सर्व क्षेत्रात आहे. पुरुष स्त्रीला 'स्त्री' म्हणून दुय्यम लेखतात ; तर उच्चवर्गीय स्त्रिया दलित- आदिवासी स्त्रियांना 'खालच्या वर्गाच्या' म्हणत तुच्छ लेखतात. अशा जाचातूनच फेब्रुवारी महिन्यात भंडारा जिल्ह्यातील लाखणी तेथील 'महिला व बालविकास' अधिकारी शीतल फाळके यांनी आत्महत्या केली. त्याआधी मुंबईतील 'नायर हॉस्पिटल'मध्ये डॉक्टरीचे शिक्षण घेणाऱ्या पायल तडवी हिने आत्महत्या केली. ही अलीकडची उदाहरणं आहेत. यातील दीपाली आणि शीतल ह्या मराठा समाजातील आहेत; तर पायल आदिवासी आहे. पायलला तिच्या सहाध्यायी मुलींकडून 'रिझर्वेशनवाली' म्हणून हिणवले जायचे. मुळात, ज्या मुली-महिला स्वतःला ब्राह्मण किंवा उच्चवर्गीय समजतात; त्यांना हे ठाऊकच नाही की, आपण जातीचा किंवा धर्माचा कितीही टेंभा मिरवला तरी एकूण व्यवस्थेमध्ये स्त्री म्हणून त्यांच्याही वाट्याला धर्म-वर्ण्य व्यवस्थेनुसार तुच्छताच आहे. ही व्यवस्था सहजासहजी बदलणार नाही. ती बदलायची असेल तर पुरुषांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहेच. परंतु, त्याआधी स्त्रियांना बदलावं लागेल. 'स्त्रीशक्ती- दास्यमुक्ती' हा काही फक्त सभा- समारंभांमध्ये वापरावयाचा आणि महिला दिनी मिरवायचा शब्द नाही. स्त्रियांच्या सन्मानासाठी स्त्रिया सजग होतील ; तरच पुरुषी मानसिकतेवर वचक निर्माण होईल. शतकानुशतकं जी व्यवस्था बदललेली नाही, ती काही वर्षांत बदलेल, अशी अपेक्षा बाळगणं व्यर्थ आहे. तथापि, ह्या बदलाची सुरुवात कधीतरी करायला पाहिजे. मेळघाटची घटना अनेक धडे देणारी आहे. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी 'मेळघाट व्याघ्र प्रकल्पा'चे डिव्हिजनल ऑफिसर विनोद शिवकुमार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आलीय. दीपाली चव्हाण यांच्याशी त्यांनी केलेल्या संवादाच्या ज्या 'क्लिप' व्हायरल झाल्यात. त्यावरून हा अधिकारी किती मुजोर आहे, ते दिसून येतं. आपल्या स्त्री सहकाऱ्यांसोबत तो ज्या भाषेत बोलतोय, त्यातून त्याची गुर्मी दिसून येते. हे 'व्हायरल' झालेलं संभाषण, हा एक नमुना आहे. त्यापलीकडे त्याच्या मुजोरीचे अनेक किस्से असतील. हे अधिकारी असे वागतात, हे त्यांच्या इतर सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांनाही माहीत असतं. तरीसुद्धा ते त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येला एकटा विनोद शिवकुमार जबाबदार नाही, तर त्याच्या कार्यालयातील इतर सहकारी आणि त्याचे वरिष्ठसुद्धा तितकेच जबाबदार आहेत. परस्परांचा सन्मान राखणारी, स्त्रियांचा सन्मान राखणारी कार्यसंस्कृती विकसित करण्यात हे सगळेच कमी पडलेत. जंगलात काम करणाऱ्या या माणसांचं माणूसपण कधी लयाला गेलं, हे त्यांनाही कळलं नसावं. त्यामुळे ज्यांच्याकडे अधिकार होते, ते श्वापदांसारखे हिंस्र बनत गेले आणि बाकीचे जिवाच्या भीतीने लपूनछपून जगणाऱ्या प्राण्यांसारखे भित्रे निघाले. अशा ह्या माणसांच्या जंगलात दीपाली चव्हाण यांच्यासारख्या संवेदनशील, कुटुंबवत्सल स्त्रीला जगणंच अशक्य बनलं. कौटुंबिक पाश मजबूत असतानाही ते तिला आत्महत्येपासून रोखू शकले नाहीत. यावरून दीपालीला होणारा त्रास किती भयंकर असेल, याची कल्पना यावी. अलीकडेच, 'टिकटॉक स्टार' पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याच्या आरोपासाठी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागलाय. 'यथा राजा, तथा प्रजा' या सूत्रानुसार त्यांच्या वन खात्यातली ही अनागोंदी स्वाभाविक म्हणायची का? या सगळ्यातून आणखी काही प्रश्न समोर येतात. ते म्हणजे, सरकारी पातळीवर अशी कोणतीही घटना घडली की, लगेच भावनांचा पूर येतो. त्यावर समाज माध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होतात. परंतु, हे फक्त भावनेचे कढ असतात. दोन दिवस ते व्यक्त होतात आणि मग सगळे विसरून जो तो आपापल्या कामाला लागतो. आताही तसंच घडताना दिसतंय. राजकीय आरोप- प्रत्यारोपांची धुळवडही सुरू आहे. राजकारणातल्या स्त्री नेत्यांनी त्यासंदर्भात वेगवेगळी विधानं केली आहेत. परंतु, एक गोष्ट लक्षात येत नाही, की अशी घटना घडते तेव्हा धार्मिक क्षेत्रातली 'शंकराचार्य- धर्माचार्य' म्हणून मिरवणारी मंडळी अशा घटनांच्या संदर्भाने कधी काहीच का बोलत नाहीत? स्त्रियांचं शोषण, स्त्रियांच्यावरील अत्याचार, परजातीला कनिष्ठ- तुच्छ- अस्पृश्य लेखणं ; ह्या अमानुष विचार-व्यवहाराला खरंतर धार्मिक क्षेत्रातल्या मुखंडांनी रचलेली आणि 'सनातन वैदिक परंपरा' म्हणून सांभाळलेली वर्ण्य-जाती व्यवस्थेची उतरंडच कारणीभूत आहे. काळ बदलला, जग प्रचंड वेगाने पुढे निघालं असलं तरी ही मंडळी आपले पीळ सोडायला; ही वर्ण्य-जाती व्यवस्था मोडायला तयार नाहीत. त्यामुळे कनिष्ठ ठरवलेल्या जाती बांधवांवरील आणि स्त्रियांवरील हल्ला- अत्याचाराच्या अनेक घटना वारंवार घडत असतात. त्याला कानठळ्या बसवणारी वाचा फुटली तरी धार्मिक क्षेत्रात दातखीळ बसलेले मौन आढळून येते. कधी चुकून अत्याचार करणारा परक्या धर्मातला असला, तर मात्र यांचा धर्माभिमान उफाळून येतो. त्यातून धार्मिक विद्वेषाची पेरणी होते. परंतु, व्यापक अर्थाने कनिष्ठ जात बांधवांना आणि स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, त्यांच्यावरचे वाढते अत्याचार यासंदर्भात बोलायला त्यांची जीभ उचलत नाही.
ढोल-गवार- पशु- शूद्र-नारी।
ये सब है ताडन के अधिकारी -
अशीच त्यांची आजही धारणा असेल तर पायल, शीतल, दीपाली यांच्या नावाने कितीही ऊरबडवेगिरी करा! स्त्री-बळीचा होम धगधगतच राहणार!
--------2-------
राज्य सरकारमागे केंद्राचे शुक्लकाष्ठ
महाराष्ट्रात 'महाविकास आघाडी'चं सरकार सत्तेवर येऊ नये, त्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 'भाजप'चं सरकार यावं, यासाठी सरकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची 'लॉबी' सक्रिय होती आणि आहे; ह्या बातम्या आश्चर्यकारक नाहीत. पण त्यात राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचाही सहभाग असावा, ही बाब नक्कीच गंभीर आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सलग दोन पत्रकार परिषदांत रश्मी शुक्ला यांचा ठळकपणे उल्लेख केल्याने त्या सर्वांच्या नजरेत आल्या आणि पाठोपाठ पदावर असताना त्यांनी केलेले कारनामेही एकापाठोपाठ लोकांसमोर आले. सचिन वाझे प्रकरणातल्या रश्मी शुक्ला यांच्या अहवालाच्या आधारे, फडणवीस यांनी जे आरोप केले, त्यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जो अहवाल सादर केला; त्यातून शुक्ला यांची बनवेगिरी आणि लबाडी उघड झाल्यानंतर, माफी मागून केंद्रात निसटणे, या गोष्टी जाहीर झाल्या. स्पष्टच सांगायचं तर, अनवधानाने का होईना, फडणवीस यांनीच शुक्ला यांना 'एक्सपोज' केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील आमदार आणि विद्यमान सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ''भाजप'ला पाठिंबा द्यावा, यासाठी रश्मी शुक्ला यांनी कसा सम्पर्क केला,'' ते उघड केलंय. ते रश्मी शुक्ला यांनी आपल्या अधिकारातली गुप्तवार्ता विभागाची यंत्रणा फडणवीस यांचं सरकार बनवण्यासाठी कशाप्रकारे कामाला लावली होती, ते स्पष्ट करण्यास पुरेसं आहे. हे सगळं उघड होत असताना परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतून दरमहा १०० कोटी रुपयांची खंडणी वसुलीचं 'टार्गेट' दिल्याच्या आरोप करून धुरळा उडवला. होळीआधीच सुरू झालेल्या ह्या राजकीय धुळवडीने 'महाराष्ट्र सरकार' आणि मुंबई पोलिसांची देशभर बदनामी झाली. परमवीर सिंग सरकारसोबत होते, तेव्हा त्यांच्या विरोधातली पोलिसांची 'लॉबी' फडणवीस यांना सगळी इत्थंभूत माहिती पुरवत होती आणि त्याआधारे फडणवीस 'ठाकरे सरकार'ला अडचणीत आणणारे प्रश्न विचारत होते. नंतर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी परमवीर सिंग यांनीच पलटी मारली! म्हणजे 'महाविकास आघाडी'च्या सरकारला आपल्या विश्वासातले पाच-दहा अधिकारीही तयार करता आलेले नाहीत. पैशाचेच व्यवहार होत असतील तर विश्वासू अधिकारी मिळणे तसे कठीणच! 'आयएएस' वा 'आयपीएस' अधिकारी हे 'केंद्र सरकार'शी निष्ठावंत असतात; हे मान्य केलं तरी 'राज्य सरकार'ला अशा अधिकाऱ्यांना विश्वास द्यावा लागतो, त्यांचा विश्वास मिळवावा लागतो. या कामात 'महाविकास आघाडी'चं सरकार कमी पडलेलं आहे. त्याचमुळे प्रशासनातील 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'च्या विचारधारेचे अधिकारी प्रबळ झाले आहेत; आणि ते या सरकारची अनेक पातळ्यांवर कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत ही कोंडी फोडण्यात सरकारला यश आलंय. मात्र असंच भविष्यात घडेल, याची खात्री देता येत नाही. कारण संघ विचारधारींच्या अतिरेकीपणा विरोधात जरब बसावी, असं कोणतंही पाऊल 'ठाकरे सरकार'ने उचललेलं नाही.
----------3---------
जग बदलाचे 'सुगावा'कार
जग कधीच आपलं नसतं. ते आपलं करून घ्यावं लागतं. ते सत्य आणि असत्य ह्याचा 'सुगावा' लागला की सहजपणे आपलं होतं. 'सुगावा' म्हणजे, जे आहे पण दिसत नाही; त्याचा ठाव घेणे, छडा लावणे आणि ते समजलं- सापडलं की जगजाहीर करणे. हे काम प्राध्यापक विलास वाघ वयाच्या ८१ व्या वर्षापर्यंत समाज परिवर्तनाच्या अट्टाहासी विचाराने करीत होते. त्यांना २५ मार्चला 'कोरोना'ने थांबवलं. तरी त्यांचं कार्य त्यांनीच दिशा दाखवलेल्या असंख्यांच्या माध्यमातून निरंतर सुरू राहणार आहे. इतकं ते विस्तारलेलं आहे. पुस्तकंच मस्तक घडवतील; सत्य-असत्य काय ते सांगतील; वास्तव- भ्रामक ह्यातील फरक दाखतील; ह्या जाणिवेने वाघ सरांनी 'सुगावा प्रकाशन'ची मांडणी केली. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला पूरक ठरतील, दिशा देतील अशी अल्प किमतीत बहुमोल विचारांची पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. त्यातून अनेक अभ्यासकांना, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्यांनी लेखक बनवलं. 'पीएच.डी-डॉक्टरेट'ची पदवी मिळवताना केलेलं संशोधनात्मक लेखन त्यांनी आवश्यक ते संस्कार करून पुस्तक रूपात आणले. पुस्तकातून मस्तक घडवण्याचे काम, हेच आपलं जीवनकार्य आहे, ह्या जाणिवेने वाघ सरांनी पुस्तकं निर्मितीचा पसारा मांडला आणि 'जीवनव्रती लोकशिक्षक' झाले. त्या आधी शिक्षकाचे प्रशिक्षण घेऊन शिक्षक झाले. वाघ सरांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या मोरणे गावचा. (जन्म : १ मार्च १९३९) तिथे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षण धुळे शहरात झालं. १९५८ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले. 'एस.पी.कॉलेज'मध्ये शिकून 'बीएससी' झाले आणि कोकणातील नरवडणे गावात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. थोड्याच दिवसात पुण्यात परतले. १९८० पर्यंत पुण्यातल्या 'अशोक विद्यालय'मध्ये शिक्षकाची नोकरी करत होते. दरम्यान, त्यांच्यातला 'सामाजिक कार्यकर्ता' त्यांना 'नोकरी एके नोकरी; नोकरी दुणे घर' असं करू देत नव्हता. ते समाजवाद्यांच्या 'राष्ट्र सेवा दल'चे कार्यकर्ते होते. पण ते स्वतःला 'आंबेडकरवादी' म्हणत. यावरून त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कार्याची दिशा-दृष्टी स्पष्ट व्हायची. १९७०-७२ या काळात 'मराठवाडा विद्यापीठ' नामांतराच्या चळवळीच्या निमित्ताने आंबेडकरी समाजात अस्मितेचा आग्रह बुलंद झाला. त्याच काळात (१९७४) वाघ सरांचे 'सुगावा प्रकाशन' आणि मासिक सुरू झाले. यातून लोकशिक्षणाचे आणि शिक्षकाचे काम करीत असतानाही त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. १९८१ मध्ये वयाच्या ४२ व्या वर्षी ते 'बीएड' झाले आणि पुणे विद्यापीठाच्या 'प्रौढ निरंतर शिक्षण' विभागात 'रीडर' म्हणून नोकरीला लागले. दोन वर्षांनी (१९८३) म्हणजे वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांनी उषाताईंशी आंतरजातीय विवाह केला. १९८६ मध्ये त्यांनी विद्यापीठातील नोकरी सोडली आणि पूर्णवेळ प्रकाशन व्यवसाय आणि सामाजिक कार्य करू लागले. १९७८ मध्ये त्यांनी तळेगाव-ढमढेरे येथे भटक्या- विमुक्त जातीच्या मुला-मुलींच्यासाठी 'आश्रम शाळा' सुरू केली होती. त्याचे विस्तारीकरण १९८९ मध्ये मोरणे येथे तशीच आश्रम शाळा सुरू करून केले. मोरणे येथेच १९९४ मध्ये 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय' सुरू केले. १९९६ मध्ये त्यांनी 'सिद्धार्थ सहकारी बँक'च्या स्थापनेत पुढाकार घेतला. त्याचे दोनदा चेअरमन झाले. संस्थात्मक कामाचे इतके व्याप वाढत असताना त्यांनी 'परिवर्तन मिश्र विवाह संस्था'ची स्थापना केली. त्यांच्या सर्व कामात उषाताई वाघ यांचा कायम सहभाग राहिला आहे. 'सुगावा प्रकाशन'च्या पुस्तकं-मासिकाच्या माध्यमातून वाघ सरांच्या कार्याचा परिचय होताच. प्रत्यक्ष परिचय २००० च्या दरम्यान त्यांचे बंधू अॅडव्होकेट वाघ यांच्यामुळे झाला. तेही कट्टर आंबेडकरवादी होते. वाघ सरांमध्ये कट्टरता नव्हती. पण वैचारिक शिस्त होती. ती त्यांच्या 'सुगावा प्रकाशन'च्या पुस्तक निर्मितीतून आणि संस्थात्मक कामातून स्पष्टपणे दिसायची. २००३ च्या दिवाळीची गोष्ट. पुण्याला गेलो असता वाघ सरांच्या सूचनेनुसार चित्रशाळेजवळच्या 'सुगावा प्रकाशन'च्या दुकानात गेलो. बऱ्याच पुस्तकांबरोबर आनंद घोरपडे यांचं 'छत्रपती शिवाजी : समज- अपसमज' हे ८० पानांचं पुस्तकही घेतलं. तेव्हा बाजारात 'पानाला एक रुपया' अशी पुस्तक विक्रीची किंमत असताना ; ह्या पुस्तकाची किंमत फक्त वीस रुपये होती. आनंद घोरपडे यांनी अत्यंत सोप्या भाषेत पुराव्यांसह छत्रपती शिवरायांबद्दलच्या गैरसमजांचा आणि ते पसरवणाऱ्यांचा समाचार घेतला होता. ह्या पुस्तकाच्या बळावरच मी राजमाता जिजाऊ आणि
छत्रपती शिवराय यांच्या चरित्राची विटंबना करण्यास जेम्स लेन या विदेशी लेखकाला भाग पाडणाऱ्यांवर 'चित्रलेखा'तून तुटून पडलो. विशेष म्हणजे, "आनंद घोरपडे यांचे पुस्तक मी चित्रलेखातून क्रमशः प्रकाशित करतो. परवानगी द्या,"अशी विनंती वाघ सरांना करताच ती त्यांनी तातडीने दिली. इतकेच नव्हे तर, ''आनंद घोरपडे यांच्याकडे 'संभाजीराजे : समज- अपसमज' हे पुस्तक तयार आहे. तेही लेखमाला म्हणून छापा! असे विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेले पाहिजेत," अशीही सूचना त्यांनी केली. ती मान्य केली. ''स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी: समज- अपसमज'' ही लेखमाला 'चित्रलेखा'त सुरू असताना वाघ सरांचा फोन आला. म्हणाले, "स्वराज्यरक्षक' ही संभाजीराजांना दिलेली उपाधी तुमचं संपादकाचं कौशल्य दाखवते," याच उपाधीने डॉ. अमोल कोल्हे यांची संभाजीराजांवरची टीव्ही मालिका गाजली आणि त्यांना खासदारही बनवून गेली. वाघ सरांच्या कार्याची मूळं ही अशी विस्तारलेली आहेत. खूप काम करूनही ते प्रसिद्धीच्या बाबतीत 'मूकनायक'च राहिले. त्यांना मिळालेले मान-सन्मानही त्यांनी वाजवले नाहीत. आता ते नाहीत. पण त्यांचं काम बोलत राहील. कारण जग हे काम करणाऱ्या परिवर्तनवाद्यांचंच आहे. जग हे विचाराचे घाव घालून बदलवणाऱ्यांचं आहे.
(लेखनकाळ : ३०मार्च२०२१)
हे 'साप्ताहिक चित्रलेखा'च्या १२ एप्रिल २०२१च्या अंकातील 'संपादकीय' आहे.
माहिती-ज्ञानासाठी आपल्या ग्रुपमधील मित्र परिवारास फॉरवर्ड/शेअर करा.
'चित्रलेखा'चा छापील अंक सुरू झालाय. आपल्या पेपरवाल्याला आणायला सांगा. सहकार्य द्या.
(अंक मिळत नसल्यास संपर्क करा:-
चित्रलेखा वितरण विभाग प्रमुख - 9819895800)
-ज्ञानेश महाराव
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...